सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील कोंत्यावबोबलाद येथील सीमाभागात असणाऱ्या सर्वात मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. सांगली जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षात जुगार अड्ड्यावर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना स्वतः ही कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी टाकलेल्या छाप्यात तब्बल २० लाखांची रोकड तसेच ४२ मोबाईल, कार, दुचाकी असा एकूण ५० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जुगार अड्ड्याचे मालक, चालक यांच्यासह ४१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या छाप्यानंतर उमदी पोलिस ठाण्याच्या प्रभारींना हटवण्याचे संकेत महानिरीक्षक फुलारी यांनी 'सांगली दर्पण'शी बोलताना दिले आहेत.
सांगली, सोलापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटकातील काहींनी मिळून सीमाभागात असलेल्या कोंत्यावबोबलाद येथे जुगार अड्डा सुरू केला होता. या जुगार अड्ड्यावर महाराष्ट्रासह कर्नाटकातील जुगारी येत असून लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याची माहिती महानिरीक्षक श्री. फुलारी यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या जुगार अड्ड्यावर अधीक्षक घुगे यांना स्वतः कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अधीक्षक घुगे यांच्या नेतृत्वात जतचे उपअधीक्षक सुनील साळुंखे तसेच अन्य अधिकारी, अंमलदारांचे एक विशेष पथक तयार केले होते. रविवारी या पथकाने कोंत्यावबोबलाद येथे छापा टाकून जुगाऱ्यांसह अड्ड्याचे चालक, मालक यांना ताब्यात घेतले.
उमदी पोलिस ठाण्याच्या प्रभारींना हटवणार
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमा भागातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असतानाही उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सवार्त मोठा जुगार अड्डा सुरू असल्याने खळबळ उडाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर विशेष महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी थेट अधीक्षक घुगे यांनाच कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. इतका मोठा जुगार अड्डा सुरू असूनही त्यावर तातडीने कारवाई न केल्याने उमदी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना हटवण्याचे संकेत महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.