Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरामध्ये बसून विदेशात पाठवा दिवाळी फराळ; पोस्टाचा नवा उपक्रम

घरामध्ये बसून विदेशात पाठवा दिवाळी फराळ; पोस्टाचा नवा उपक्रम
 

पिंपरी-चिंचवड: परदेशातील आपल्या नातेवाईकांना दिवाळीचा फराळ वेळेवर पोचावा यासाठी घाई गडबड असते. आतापर्यंत खासगी कुरियरतर्फे हा फराळ परदेशात पोहोचत असे आणि तेथील नातेवाईकांची दिवाळी गोड होत असे. मात्र, कुरियरचे जाळे सर्वत्र नसल्याने काही जणांना अडचण येत असे. आता टपाल विभाग दिवाळी फराळ परदेशात वेळेवर पोहोचविण्यासाठी सज्ज आहे.

दिवाळीनिमित्त टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला असून फराळाचे पदार्थ दिल्यानंतर लगेच पॅकिंग करून परदेशात पाठविण्याची सोय केली आहे. विशेष म्हणजे फराळ पाठविण्यासाठी मुहूर्त लागत नाही. वेळ नसल्यास ज्यांना कार्यालयामध्ये जाता येत नाही अशा नागरिकांसाठी घरी येऊन फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जाणार आहेत.

नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यातून परदेशामध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. परदेशामध्ये वास्तव्यास असलेल्या प्रत्येकालाच दिवाळीच्या सणासाठी भारतामध्ये किंवा पुण्यामध्ये व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. ही बाब ध्यानात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ, भेटवस्तू पाठवून त्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करतो. त्यासाठी टपाल विभागाने पार्सल परदेशात पोहोचविण्याची जबाबदारी उचलली आहे. शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाळी फराळ परदेशामध्ये पाठविण्याची सुविधा, तसेच फराळाचे पॅकिंग करण्याची सोयही उपलब्ध आहे. टपाल विभागाने मागील वर्षी दिवाळीनिमित्त ७ हजार ५०० किलो फराळ पुण्यातून परदेशात अगदी वेळेत पाठविण्याचा विक्रम केला होता.
पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड पूर्व, मार्केट यार्ड , पर्वती शिवाय इतर कार्यालयात फराळाच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हे बॉक्स लगेचच परदेशात पाठविले जाणार आहेत. 

याबाबत पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये पुणेकरांना उद्देशून म्हणाले की, ह्या नव्या सेवेचा अधिकाधिक पुणेकरांनी लाभ घेऊन दिवाळी फराळ आपल्या नातेवाईकांना पाठवावा. आजपासून ते दिवाळीपर्यंत फ्री पिकअपच्या सेवेसाठी ९८३४४८२१०५ व ७०२८००७२३५ या क्रमांकावर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत संपर्क करू शकतात.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.