Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मविआमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा : नाना पटोले

मविआमध्ये काँग्रेसच्या वाट्याला ८४ जागा : नाना पटोले

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राजधानी दिल्लीत काँग्रेसच्या छानणी समितीची बैठक पार पडली. महाविकास आघाडीमध्ये २८८ जागांपैकी २२२ जागांचा तिढा सुटला असून ६६ जागांचा फैसला बाकी आहे 

यापैकी ८४ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार उर्वरित जागांमधूनही जवळपास २५ जागा काँग्रेसला येण्याची शक्यता आहे, त्यामुळे काँग्रेस राज्यात जवळजवळ ११० जागा लढण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईत शिवसेना ठाकरे गट मोठ्‌या भावाच्या भूमिकेत असल्याचे समजते.


महाराष्‍ट्रातील नेतेमंडळी दिल्‍लीत दाखल 

छाननी समितीच्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, नाना गावंडे ही नेते मंडळी दिल्लीत दाखल झाली. दरम्यान, नाना पटोले म्हणाले की, २० तारखेला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे. या बैठकीनंतर पहिली यादी येणे अपेक्षित आहे. महाविकास आघाडीमध्ये कोण मोठा भाऊ कोण लहान भाऊ याचा आम्ही विचार करत नाही, मेरीटवर आम्ही पुढे जात आहोत.

फडणवीसांकडे जास्‍त लक्ष देण्याची गरज नाही 


दोन दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे खोटारडे नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हणत पटोलेंनी फडणवीसांना टोला लगावला. तर विजय वडेट्टीवार म्हणाले की, दुसऱ्यांचे पक्ष फोडायला अमित शाह यांना मेहनत लागली, त्यामुळे त्यांची त्यागाची भावना बरोबर आहे, असे म्हणत त्यांनी अमित शाह यांनाही टोला लगावला.

महाराष्‍ट्रासाठी छानणी समिती 

महाराष्ट्रासाठी ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली छानणी समिती काम करत आहे. यामध्ये सप्तगिरी संकर उलका, मन्सूर अली खान, डॉ. श्रीवेल्ला प्रसाद हे नेतेही सदस्य आहेत. तसेच या समितीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांसह प्रदेश काँग्रेसचे प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षनेते हे पदसिद्ध सदस्य आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी तयार केलेल्या छानणी समितीमध्ये मुंबई विभागीय काँग्रेस अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते हेही पदसिद्ध सदस्य आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.