'आप' मंत्र्याने भाजप आमदाराचे पकडले पाय; व्हिडिओ व्हायरल
नवी दिल्ली :- बस मार्शलच्या नियुक्तीचा मुद्दा सध्या दिल्लीत चर्चेचा विषय आहे. या मुद्द्यांवरून राजकीय गोंधळ झाला. या गोंधळादरम्यान, दिल्लीचे मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी चक्क भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांचे पाय पकडल्याचे दिसले. त्यांचा हा फोटो व्हायरल झाला असून यावरुन राजकीय चर्चा रंगली आहे.
आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीच्या प्रत्येक लोकल बसमध्ये ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यासह एका बस मार्शलची नियुक्ती केली होती. या बस मार्शलच्या नियुक्तीमागे महिलांची सुरक्षा हे कारण सरकारने सांगितले होते. यासाठी १० हजार हून अधिक बस मार्शल तैनात करण्यात आले होते. मात्र, या नियुक्तीला नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा मुद्दा राजकीय झाला आहे. बस मार्शल नियुक्तीच्या मुद्द्यावर आज दिल्ली सरकारने सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत भाजपच्या आमदारांना बस मार्शलने सवाल केल्याचे दिसले.
बैठकीनंतर बस मार्शलच्या नियुक्तीचा प्रस्ताव घेऊन नायब राज्यपालांच्या घराकडे मुख्यमंत्री अतिशी आणि मंत्री निघाले. तेव्हा भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांनी नायब राज्यपालांच्या घराकडे यावे, ही मागणी करत चक्क सौरभ भारद्वाज यांनी त्यांचे पाय पकडले. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भारद्वाज यांचे कौतुक केले. लोकांची कामे करण्यासाठी लोकांच्या पाया पडणाऱ्या मंत्र्यांचा मला अभिमान असल्याचे केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. नायब राज्यपाल आणि भाजपने या मुद्द्यावर राजकारण करु नये. तात्काळ बस मार्शल नियुक्तीला मंजुरी द्यावी, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
बस मार्शल नियुक्तीच्या प्रस्तावाला सरकारची मंजुरी
बस मार्शलच्या नियुक्तीच्या चर्चेची बैठक झाल्यावर, दिल्ली सरकारने एकमताने या प्रस्तावाला मंजूर केले. प्रस्तावाच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री अतिशी स्वतः भाजप आमदार विजेंद्र गुप्ता यांच्या गाडीत बसून नायब राज्यपालांच्या निवासस्थानाकडे गेल्या. या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी बस मार्शलसमवेत नायब राज्यपालांच्या घरासमोर निदर्शने केली. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.