सांगलीत अजून एका घराण्यात दुहीची बिजे
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात राजकीय क्षेत्रात मातब्बर असलेल्या काही घराण्यात जुन्या वादाबरोबरच नव्या वादाने डोके वर काढले असून यातून आटपाडीच्या देशमुख वाड्यावर दुहीची बीजे दिसत आहेत.
माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मनोदय कार्यकर्त्यांच्या बैठकीत जाहीर करत असताना आटपाडीच्या स्वाभिमानासाठी हा निर्णय घेत असल्याचे सांगितले, मात्र, गेली २० वर्षे हा स्वाभिमान कुठे डांबून ठेवला गेला होता, याला उत्तर मिळत नाही. तथापि, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी आपण भाजपमध्येच असल्याचे सांगत अप्रत्यक्ष या निर्णयाला विरोध करत असताना, स्वाभिमानाच्या या लढाईत मी माझ्या परीने सहभागी होत असल्याचे सांगितले. वसंतदादा घराण्यात जसा थोरली पाती व धाकटी पाती असा वाद आहे तसाच वाद आता आटपाडीच्या देशमुख वाड्यावर नजीकच्या काळात अधिक जोरकसपणे पाहण्यास मिळाला तर आश्चर्य वाटायला नको.
आटपाडी तालुका तसा बारमाही दुष्काळी तालुका, व्यंकटेश तात्याच्या लेखनीने मराठी साहित्यात अजरामर झालेली बनगरवाडी याच तालुक्यात लेंगरेवाडी या नावाने आजही आपले अस्तित्व राखून आहे. अलिकडच्या काळात टेंभू योजनेच्या पाण्याने समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. या तालुक्यात उस नसतानाही महांकाली साखर कारखान्याची उभारणी झाली. स्व. बाबासाहेब देशमुख यांचे समाजकारण जवळून पाहणारी मंडळी या तालुक्यात आजही आहेत. सांगोल्याचे शेकापचे असले तरी विकास कामात सहकार्याचा हात पुढे करणारे स्व. गणपतराव देशमुख यांच्या मदतीने महांकाली कारखान्याची वाटचाल सुरू होती. मात्र, साखर उद्योगच अडचणीत येत गेल्याने सहकारातील या साखर कारखान्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. आज हा कारखाना जिल्हा बँकेच्या ताब्यात आहे.
कारखाना उभारणीत देशमुख गटाचे योगदान असतानाही निवडणुकीमध्ये या गटाच्या पॅनेलला अखेरच्या क्षणी सांगोल्याकडून कुमक न मिळाल्याने माघार घ्यावी लागली आणि कारखाना जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या ताब्यात गेला. तत्पुर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार देशमुख यांचा पराभव झाला. भाजपच्या पॅनेलमधून त्यांनी ही निवडणूक लढवली. मात्र, शिवसेनेचे उमेदवार म्हणून स्व. अनिल बाबर यांच्यासोबत पाटील यांना संचालक होण्याची संधी मिळाली. त्यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देशमुख गटाच्या मदतीसाठी होते. मात्र, गावपातळीवरच्या राजकारणात देशमुख गटाला महत्व आजही आहे. तरीही देशमुख गटाला कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. या मागे आमदार जयंत पाटील यांची राजकीय खेळी असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेला पराभव, माणगंगा कारखाना निवडणुकीत घ्यावी लागलेली माघार या बाबी नजरेआड करत देशमुख यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश करत विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा केली. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळत नाही असे दिसताच अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या बाबी धाकटे बंधू बापूसाहेबांना पटलेल्या दिसत नाहीत. पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांना राजकीय अवकाश मिळावा हाही हेतू यामागे असावा अशी शंका येते. मात्र हा अवकाश मिळवण्यासाठी जी राजकीय ताकद लागते, उपद्रव मूल्य लागते ते मात्र दिसत नाही. कारण राजेंद्रअण्णांचा स्वभाव जसा मितभाषी तसाच नेमस्त आहे.
आटपाडी तालुक्याला गेली दोन दशके विधानसभेची संधी मिळाली नाही. मात्र, या मतदारसंघावर खानापूर तालुक्याचेच वर्चस्व राहिले आहे. कधी गार्डीच्या बाबर गटाचे तर कधी विट्याच्या पाटलांचे. यात आटपाडीच्या देशमुख गटाचा वापर केवळ मतांच्या गठ्ठ्यासाठीच झाला असे दिसते. आता बदलत्या काळात राजकीय अवकाश शोधण्याचे काम या गटाला करावे लागणार आहे. मात्र, यासाठी अपक्षाचा झेंडा किती काळ खांद्यावर घ्यावा लागणार याचे उत्तर येणारा काळच देईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.