प्रेमविवाह आले अडचणीत! लग्न आणि घटस्फोटांचे लेखी करार नोटरी करण्यास बंदी
विवाहाचे तसेच घटस्फोटांचे लेखी करार डीड नोटरी करणे बेकायदेशीर ठरवण्यात आलेले आहे. केंद्रीय कायदा मंत्रालयाने या संदर्भातील आदेश पारित केलेले आहे. विवाहाचे किंवा घटस्फोटांचे डीड करून देणाऱ्या नोटरींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
विवाह आणि घटस्फोटांचे डीड नोटरी करता येणार नाहीत
प्रेमविवाहाच्या प्रकरणात नोटरी केली जाण्याची सर्रास पद्धत दिसून येते. विविध धार्मिक ठिकाणी विवाह होतात. धार्मिक विधी झाल्यानंतर विवाहाची डीड नोटरी केले जातात. विशेषतः पालकांच्या संमतीशिवाय होत असलेल्या प्रेमविवाहात नोटरीचा वापर होत असल्याचे दिसून येते. पण आता केंद्र सरकारने विवाह तसेच घटस्फोटांचे डीड नोटरी करता येणार नाहीत, असे स्पष्ट आदेश काढले आहेत. ही बातमी लाईव्ह लॉ या वेबसाईटने दिली आहे.
"नोटरींची नियुक्ती ही मॅरेज ऑफिसर म्हणून करण्यात आलेली नसते. त्यामुळे त्यांना विवाह तसेच घटस्फोटांचे लेखी करार करता येणार नाहीत," असे या आदेशात म्हटले आहे.
नोटरी म्हणजे विवाह अधिकारी नव्हेत
कायदा विभागाचे उपसचिव राजीव कुमार यांनी ही हे आदेश पारित केले आहेत. "नोटरीचीं नियुक्ती नोटरीज अॅक्ट १९५२ नुसार केलेली असते. कायद्याने नोटरींना घटस्फोटांचे आणि लग्नाचे लेखीकरार करता येत नाहीत, कारण ते विवाह अधिकारी नाहीत. अशी कृती ही कायदाबाह्य असेल आणि ती शिस्तभंग समजून संबंधित नोटरींवर कारवाई केली जाईल. ही कारवाई नोटरी अॅक्ट १९५२ आणि नोटरीज रूल १९५६ मधील तरतुदींनुसार केली जाईल."
ओडिशा उच्च न्यायालय, मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालय यांनी नोटरींनी विवाह आणि घटस्फोटाचे लेखीकरार करू नयेत, असे आदेश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या कायदा विभागाने हे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.