बी. व्ही. जोंधळे, ज्येष्ठ विचारवंत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्कामी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी धर्मांतराची घोषणा केली आणि १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याचा अर्थ २१ वर्षे विविध धर्मांचा अभ्यास करून बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारण्याच्या निर्णयावर आले असे मानण्यात येते.
तसे पाहता, बाबासाहेब जेव्हा मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांचा रावबहादूर सी. के. बोले यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता. त्या सत्कार समारंभात गुरुवर्य अर्जुनराव केळुसकरांनी लिहिलेले बुद्ध चरित्र त्यांना भेट देण्यात आले होते. ते बुद्ध चरित्र वाचून विद्यार्थीदशेतच बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारायचा निर्णय घेतला होता. मग, १९३५ साली धर्मांतराची घोषणा करून १९५६ साली धर्मांतर करण्यासाठी त्यांनी २१ वर्षे का घेतली? तर त्यांना फक्त एकट्याला धर्मांतर करायचे नव्हते तर आपल्या समाज बांधवांचीही धर्मांतरासाठी मानसिक जडणघडण करावयाची होती. ती जेव्हा झाली तेव्हा त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली धम्मदीक्षा घेतली.
बाबासाहेबांच्या मनावर बुद्ध धम्माचा प्रभाव फार पूर्वीच पडला होता. म्हणूनच १९४५ साली स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील महाविद्यालयाचे नाव त्यांनी 'सिद्धार्थ महाविद्यालय' असे ठेवले. धम्म विचारांची पाठराखण करण्यासाठी त्यांनी संस्थेचे ब्रीदवाक्य ठरवले- 'प्रज्ञा - शील - करुणा'. छत्रपती संभाजीनगरच्या महाविद्यालयाचे नाव त्यांनी 'मिलिंद महाविद्यालय' ठेवले तर परिसराला 'नागसेनवन' असे नाव दिले. शिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी बोधचिन्ह स्वीकारले ते सम्राट अशोकाने अनुप्रवर्तीत केलेल्या 'धम्मचक्रा'चे.
बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या 'मेनकावा' या इमारतीचे नाव त्यांनी 'बुद्ध भवन' तर 'अल्बर्ट बिल्डिंग'चे' नामांतर 'आनंद भवन' केले. त्यांनी स्वतःच्या मुद्रणालयास 'बुद्ध भूषण प्रिंटिंग प्रेस' हे नाव दिले होते. १९५४ साली बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा म्हणजेच 'दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया'ची नोंदणी केली होती. या साऱ्या घटना म्हणजे आपण बौद्ध धम्म स्वीकारणार आहोत याचे बाबासाहेबांनी दिलेले संकेतच होते.
१५ ऑगस्ट १९४७ ला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे नाव 'हिंदुस्थान' ठेवावे, अशी एक मागणी पुढे आली होती. तसे झाले असते तर देशातील अन्य धर्मियांना दुय्यम स्थानी राहावे लागले असते. देशात अलगतावाद प्रबळ झाला असता. घटनेच्या कलम क्रमांक १ अन्वये देशास 'भारत' हे नाव दिले गेले. भारताच्या राष्ट्रध्वजावरील 'अशोकचक्र', कमळ हे 'राष्ट्रीय फुल', राजमुद्रेसाठी 'अशोकाचे चार सिंह', लोकसभेच्या सभागृहाला दिलेले 'अशोका हॉल' हे नाव, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या बैठकीच्या स्थानामागे कोरलेल्या 'धम्मपदातील गाथा' ही सारी प्रतीके बुद्ध धम्मातून घेतली गेली आहेत.बुद्ध धम्माच्या मानवतावादी तत्त्वज्ञानावर आधारित संविधानाच्या अस्तित्वासमोर आज धोके निर्माण झालेले दिसतात. हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या आड संविधान येते म्हणून संविधान बदलण्याचे कधी उघड तर कधी छुपे प्रयत्न सुरूच असतात. धर्मनिरपेक्ष भारताला देववादी नि दैववादी बनवायचे खेळ करावयाचे असे प्रकार घडत आहेत. धर्मांधता, असहिष्णुता वाढीस लागली आहे. भारतीय राज्यघटनेने जी मूल्ये स्वीकारली आहेत आणि सामाजिक पुनर्रचनेसाठी लोकशाही मूल्यांचा, धर्मनिरपेक्षतेचा जो विचार मांडला आहे, त्या प्रकारचा भारतीय समाज बाबासाहेबांना अपेक्षित होता. बाबासाहेबांनी केवळ धर्म बदलला नाही तर नवा मूल्यविचार दिला. तो अधिक सक्षम, बळकट करण्याची जबाबदारी सर्वच संविधानप्रेमी लोकांची आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.