Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

देवघरात दिवा लावताना साडी पेटून वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू; महिला वृद्ध व अशक्त असल्याने ओरडायलाही ताकद नव्हती अन्..

देवघरात दिवा लावताना साडी पेटून वृद्धेचा दुर्दैवी मृत्यू; महिला वृद्ध व अशक्त असल्याने ओरडायलाही ताकद नव्हती अन्..
 

सुनीता एकट्याच घरी होत्या. नवरात्रीनिमित्त देवघरात तेलवात घातली होती. साडेसातच्या सुमारास त्या देवघरात जाऊन पूजा करताना तेथेच असलेल्या दिव्याला त्यांच्या साडीचा पदर लागला.

महागाव : घरातील देवघरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्धेच्या साडीने पेट घेतला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले असता औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुनीता नारायण दंडगे (वय ७०) असे मृत वृद्धेचे नाव आहे. काल सकाळी साडेसातला ही घटना घडली. 

पोलिसांनी सांगितले की, महागावात ग्रामपंचायतीजवळ  दंडगे गल्लीत नारायण दंडगे व पत्नी सुनीता दोघेच राहतात. सकाळी नारायण दूध आणायला म्हणून डेअरीत गेले. त्यावेळी सुनीता एकट्याच घरी होत्या. नवरात्रीनिमित्त देवघरात तेलवात घातली होती. साडेसातच्या सुमारास त्या देवघरात जाऊन पूजा करताना तेथेच असलेल्या दिव्याला त्यांच्या साडीचा पदर लागला. काही कळायच्या आतच त्यांच्या साडीने पेट घेतला. वृद्ध व अशक्त असल्याने सुनीता यांना ओरडायलाही ताकद नव्हती. 

दरम्यान, पंधरा मिनिटांत पती नारायण घरी आले. तेव्हा सुनीता पेटताना दिसल्या. नारायण यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील ग्रामस्थ धावून आले व आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. जखमी सुनीता यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले; परंतु औषधोपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची फिर्याद विवेक दंडगे यांनी पोलिसांत दिली आहे.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.