सहा एड्स रुग्णांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्र्यांचा 'हनीट्रॅप'; समोर आली स्फोटक माहिती, भाजप आमदारच मुख्य सूत्रधार
मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून 'हनीट्रॅप' केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे.
बंगळूर : माजी मंत्री आणि भाजपचे आमदार मुनिरत्न यांनी दोन माजी मुख्यमंत्र्यांना 'हनीट्रॅप' करून मंत्रिपद मिळविल्याचा आरोप मुनिरत्न यांच्यावर अत्याचाराचे आरोप केलेल्या पीडित महिलेने केला आहे.
सरकारने आपल्याला सुरक्षा दिली, तर माजी मुख्यमंत्र्यांची नावे आणि संबंधित व्हिडिओ सादर करू, असेही ती म्हणाली. महिलेवरील अत्याचाराच्या आरोपाखाली मुनिरत्न सध्या कारागृहात आहेत.
बंगळूर येथे एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पीडित महिला म्हणाली की, मुनिरत्न यांनी मंत्रिपद मिळवण्यासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांना हनीट्रॅप करण्यात आले आणि छळ करण्यात आला. मुनिरत्न यांच्याकडे अतिशय प्रगत कॅमेरे आहेत, जे इतर कोणत्याही माध्यमांकडे नसतील.
आमच्यासारख्या असहाय महिलांचा वापर करून दोन माजी मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांना त्यांनी 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात अडकविले आहे तसेच व्हिडिओही बनवला. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारीही 'हनीट्रॅप' झाले आहेत. एसीपी, सीपीआयचे अधिकारी हनीट्रॅप झाले आहेत. माझे आणि मुनिरत्न यांचे 'ब्रेन मॅपिंग' करावे, असे आव्हान या पीडित महिलेने अश्वत्थ नारायण व विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना दिले आहे.माझ्याकडे योग्य ते पुरावे आहेत. मी एसआयटीला देण्यास तयार आहे. मात्र, सरकारने सुरक्षा देण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. मुनिरत्नांनी स्वतः मला त्यांचा मोबाईल देऊन पाठवला. त्यांचे निकटवर्तीय सुधाकर यांच्यामार्फत हनीट्रॅप करण्यात आला, असे ती म्हणाली. मला माझा वैयक्तिक मोबाईल वापरता येत नाही. मला धमकावून हनीट्रॅप केल्याचे पुरावे आहेत. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सत्यापासून दूर आहेत. माझ्या आयुष्यात काही अडचण आली, तर त्याला थेट मुनिरत्न जबाबदार असतील. तक्रार मागे घेण्याची धमकी ते देत आहेत.
याबाबत मी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे तिने सांगितले. त्यांनी माझा हनीट्रॅपिंगसाठी वापर केला नाही. इतर महिलांचा वापर केला. 'हनीट्रॅप'साठी बोलावलेल्या पाच-सहा पीडित महिला आता घाबरून गप्प आहेत. माझ्यासारख्या त्या बाहेर आल्या तर सर्व सत्य बाहेर येईल, असे ती म्हणाली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. विजयेंद्र यांनी आपल्याला दहा मिनिटे भेटण्याची वेळ द्यावी. त्यांच्याशी दहा मिनिटे बोलायचे आहे. या सर्व प्रकारानंतर मुनिरत्न यांना पक्षात का ठेवले आहे, हे विचारायचे आहे, असे ती म्हणाली.
एड्स रुग्णांचा वापर
मुनिरत्न यांनी सहा एड्स रुग्णांचा वापर करून 'हनीट्रॅप' केले. त्यात आमदार, पोलिस अधिकारी आणि उच्च सरकारी अधिकारी यांचा समावेश आहे. सुमारे २० ते ३० राजकीय नेत्यांना हनीट्रॅप करून त्यांचे व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आल्याचे पीडितेने सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.