खंडणीबहाद्दर महेश ठाकूरला नागपुरातून अटक
रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील एका खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी महेश ठाकूर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरातून अटक केली. ठाकूर विरोधात 23 सप्टेंबर रोजी रामनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांना तो सतत गुंगारा देत होता.
अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
मालगुजारीपुरा येथील निलेश मांडवीया याला पैशाची गरज असल्याने त्यांनी अनमोल बेद याच्या ओळखीतील महेश ठाकूर याच्याकडून 7 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर पैशांची गरज असल्याने महेश ठाकूर याच्याकडून पुन्हा 20 लाख रुपये असे 27 लाख रुपये व्याजाने घेतले. त्या रक्कमेचे 8 टक्केप्रमाणे तो महेश ठाकूरला व्याज देत होता. दरम्यान, महेश ठाकूर याने निलेश मांडवीया याला व्याजाने दिलेले पैसे व मुद्दल असे 80 लाख रुपये झाल्याचे सांगत पैसे दे नाहीतर शेअर्सची नोटरी करून दे, असा तगादा लावला. सोबतच वेळोवेळी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही ठाकूर देत होता. अखेर या त्रासाला कंटाळून निलेश मांडवीया याने रामनगर पोलिसात तक्रार दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच महेश ठाकूर हा फरार झाला होता.
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू करून वेगवेगळे पथके तयारी केली. या पथकांनी नागपूर, छिंदवाडा, जबलपूर, सतना, मध्य प्रदेश या परिसरात शोध घेतला. मात्र, अनेकदा त्याने पोलिसांना गुंगारा दिला. दरम्यान, महेश ठाकूर हा दिल्ली येथून रेल्वेने नागपूर येथे येत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाने दिल्लीवरून येणार्या सर्व रेल्वे प्रवाशांवर पाळत ठेवली आणि महेश ठाकूर दिसताच त्याला सापळा रचून ताब्यात घेतले.ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, संतोष दरगुडे, मनोज धात्रक, गजानन लामसे, अरविंद येनुरकर, रितेश शर्मा, राजेश तिवस्कर, श्रीकांत खडसे, भूषण निघोट, पोलिस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे, आदींनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.