Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'व्हेरिकोज व्हेन्स'चा त्रास होण्यामागची कारणे काय? 'हे' उपाय करा

'व्हेरिकोज व्हेन्स'चा त्रास होण्यामागची कारणे काय? 'हे' उपाय करा
 

आपल्या संपूर्ण शरीराचा भार पायांवर असतो. त्यांच्याशिवाय चालणं, फिरणं, पळणं, उभं राहणं, बसणे अशा सर्व क्रिया होत नाहीत. असं असलं तरी बरेचदा पायांच्या तक्रारींकडे आपण दुर्लक्ष करतो. रक्ताभिसरण संपूर्ण शरीरामध्ये होत असते. हृदयापासून पायाच्या तळव्यापर्यंत, तळव्यांपासून परत हृदयापर्यंत हे रक्ताभिसरण सुरू असते. पायापासून हृदयापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने रक्त वाहून नेण्याचे काम पायातील वाहिन्या आणि त्यामध्ये असणार्‍या एकाच दिशेने उघडणार्‍या झडपांच्या मदतीने करत असतात.

या झडपा कमकुवत झाल्या, तर रक्तप्रवाहाच्या क्रियेमध्ये बदल होतो. या वाहिन्या हळूहळू वेड्यावाकड्या होतात. फुगतात आणि निळ्या-जांभळ्या दिसू लागतात. बहुतेक स्त्रियांना गरोदरपणाच्या काळात किंवा बाळंतपणानंतर गुडघ्याभोवती, मागे निळसर लाल रक्तवाहिन्यांचे जाळे दिसू लागते. काहींचे हे जाळे कालांतराने फिकट होते अथवा नाहीसे होते; पण काहींना मात्र या वाहिन्यांचा त्रास जाणवू लागतो. यालाच वैद्यकीय भाषेत 'व्हेरिकोज व्हेन्स' म्हणतात. या व्हेन्स पायाच्या आतल्या बाजूस, मांडीपासून घोट्यापर्यंत ठळकपणे उठून दिसतात. 

नंतरच्या अवस्थेत घोट्याजवळ काळेपणा येतो. जखम किंवा पुरळ उठून तिथे खाज सुरू होते. अशी रक्तवाहिनी काही वेळा फुटते. यामध्ये जर गुठळी निर्माण झाली आणि ती रक्तप्रवाहाबरोबर इतरत्र गेली तर इतर धोके उत्पन्न होऊ शकतात. म्हणूनच हा त्रास होऊ लागल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हा त्रास अधिक दिसून येतो. स्त्री ही निसर्गतः अधिक संवेदनशील असते. तिच्यात अधिक संप्रेरक बदल होत असतात. वाढत्या वयाबरोबरच रक्तवाहिन्यांच्या झडपांची दुर्बलता वाढते आणि स्नायूंची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हा त्रास सुरू होऊ शकतो. लठ्ठपणामुळे पायांवरचा ताण वाढून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो. स्त्रियांना गरोदरपणात किंवा बाळंतपणात हा त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ उभं राहून काम करणार्‍या किंवा सतत बैठं काम करणार्‍या व्यक्तींना हा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. एखाद्या अपघातानंतर किंवा इजा झाल्यानंतरही हा त्रास होण्याची शक्यता वाढते.
पायात सतत वेदना निर्माण होणे, पाय सुजणे, पाय जड वाटणे. थोडे चालल्यास पाय थकणे, पोटरीचे स्नायू दुखणे, पायाचा अंगठा सुजणे, पायाची त्वचा काळवंडणे आदी त्रास रुग्णाला कमी-अधिक प्रमाणात जाणवू शकतो. व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तीसाठी चांगल्या तज्ज्ञांकडूनच त्याचा इलाज करावा. हा आजार होऊ नये किंवा लवकर बरा व्हावा म्हणून काळजी घ्यावी. आहारात योग्य प्रमाणात मीठ, भाज्या, फळांचा समावेश असावा. नियमितपणे चालण्याचा व्यायाम करावा. 

प्राणायाम, योगासने यांचाही तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. रुग्णाने पाठीवर झोपून पाय थोडे उंच घेऊन काही काळ झोपावे. सतत खुर्चीवर बसून राहू नये. एक पाय दुसर्‍या पायावर टाकून बसू नये. अधिक काळ प्रवास करायचा असेल तर मध्ये थांबून फेर्‍या माराव्यात. दीर्घकाळ उभे राहावे लागत असल्यास शरीराचा भार हा एका पायावर टाकून उभे राहू नये. घट्ट कपडे घालू नयेत. पादत्राणांचा आकार योग्य असावा. वजन नियंत्रणात ठेवावे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.