Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांची खैर नाही; ४०० पोलिसांना दंड भरण्याची रेल्वेकडून नोटीस

आता रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांची खैर नाही; ४०० पोलिसांना दंड भरण्याची रेल्वेकडून नोटीस
 

सामान्य माणूस जर विनातिकीट किंवा वेटिंग तिकीटावर ट्रेनमध्ये चढला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र पोलीस दलात कार्यरत असणारे काही जण मात्र या नियमाला गृहित धरून चालतात. अनेक ठिकाणी पोलीस विनातिकीट किंवा प्रथम दर्जाच्या डब्यात प्रवास करताना आढळतात. पण उत्तर प्रदेशच्या प्रयागराज स्थानकाने अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागच्या सहा महिन्यात विविध ट्रेन आणि एक्सप्रेस गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ४०० पोलिसांना दंड भरण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जेव्हा विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात मोहीम चालविली होती, त्यात अनेक पोलीस वातानुकूलित डब्यात आणि पँट्रीमधून प्रवास करताना आढळून आले. ज्यामुळे इतर प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागला होता.

उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी या प्रकरणी माहिती देताना म्हणाले, भारतीय रेल्वेकडून अधूनमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविली जाते. विनातिकीट प्रवाशांमुळे इतर प्रवाशांना नाहक त्रास तर होतोच, त्याशिवाय रेल्वेचेही आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळेच हे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही काही कडक उपाययोजना राबविल्या आहेत. जेणेकरून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसविता येईल.

भारतीय रेल्वे तिकीट तपासणीस संघटनेचे विभागीय सचिव संतोष कुमार म्हणाले, “काही पोलीस अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून वातानुकूलित डब्यात शिरतात आणि तेथील मोकळ्या जागांवर ताबा मिळवतात. जर त्या आरक्षित जागेवरील प्रवासी डब्यात आल्यास संबंधित पोलीस जागा मोकळी करण्यास नकार देतात. कधी कधी तर पोलीस प्रवाशी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनाही धमकावतात.”

प्रयागराज रेल्वे स्थानकाने ही कडक कारवाई केल्यानंतर इतर प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे. तसेच याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, तिकीट तपासनीस आणि रेल्वे वाहतूक अधिकाऱ्यांनी पोलिसांकडून दंड वसूल करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांना धमकावण्यात येते. उत्तर प्रदेश पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विनातिकीट रेल्वे प्रवास करू नये, असे परिपत्रक काढूनही त्याचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. या परिपत्रकाला पोलीस दलातूनच अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.