Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुत्रे आडवे आल्याने अपघात; पती-पत्नीचा मृत्यू!

कुत्रे आडवे आल्याने अपघात; पती-पत्नीचा मृत्यू!

मोटार सायकलला कुत्रे आडवे येऊन झालेल्या अपघातात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगाराचा व त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवार ता 20 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहोळ ते पंढरपूर पालखी मार्गावर देगाव हद्दीत झाला.

महादेव रामचंद्र गुंड वय 65 व आशाबाई महादेव गुंड वय 55 दोघेही रा मगरवाडी अशी मृत पती व पत्नीचे नाव आहे. 

पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, महादेव गुंड व आशाबाई गुंड हे मूळचे कोन्हेरी ता मोहोळ चे रहिवासी आहेत. महादेव गुंड हे टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यातील रसायन विभागात ज्यूस सुपरवायझर या पदावर कार्यरत होते. सध्या ते मगरवाडी ता पंढरपूर येथे राहण्यासाठी गेले होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता दोघे पती-पत्नी शाईन मोटरसायकल नंबर एम एच 13 सीसी 6217 वरून दिपवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी पंढरपूर कडे निघाले होते. 

सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास महादेव गुंड यांचा मुलगा रविकिरण याच्या मोबाईल वर वडिलांच्या मोबाईल वरून फोन आला की, देगाव हद्दीतील एका पेट्रोल पंपा जवळ मोटरसायकलवर निघालेले पुरुष व महिला यांच्या मोटर सायकलला कुत्रे आडवे आल्याने दोघेही मोटरसायकल वरून पडले आहेत, त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना शेगाव दुमाला ता पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले.


निरोप मिळताच रविकिरण व त्यांचा एक नातेवाईक असे दोघे रुग्णालयात गेले. त्या ठिकाणी डॉक्टरांची भेट झाल्यानंतर त्या दोघांना अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे डॉक्टरांनी सांगीतले. त्यानंतर सात वाजता डॉक्टरांनी महादेव व आशाबाई या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे रविकिरण यांना सांगितले. या अपघाताची खबर रविकिरण महादेव गुंड वय 34 रा मगरवाडी यांनी पंढरपूर पोलिसात दिली आहे. अधिक तपास तारापूर बीटचे अंमलदार नितीन चवरे करीत आहेत.

दरम्यान हे वृत्त भीमा कारखान्यावर समजताच शोक सभेचे आयोजन करून कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांच्या वतीने व सर्व कामगारांनी श्रद्धांजली वाहिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.