Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आधी तो बनून विद्यार्थ्यांना घडवलं, मग ती बनून झाली देशातली पहिला शिक्षिका, एका कोकणकन्येची कहाणी!

आधी तो बनून विद्यार्थ्यांना घडवलं, मग ती बनून झाली देशातली पहिला शिक्षिका, एका कोकणकन्येची कहाणी!
 

सिंधुदुर्ग : एक काळ असा होता जेव्हा तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे केवळ पैसे मागण्याचं काम, अशी समजूत होती. परंतु अनेक तृतीयपंथी व्यक्तींनी या समजुतीला छेद देऊन आज विविध क्षेत्रांमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका आपल्या कोकणात आहेत. 'प्रवीण ते रिया' असा हा संघर्षमय यशस्वी प्रवास. आज त्या शिक्षणाच्या माध्यमातून देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्याचं कार्य करतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या तुळसुली गावातील प्रवीण वारंग यांना लहानपणापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड होती. त्यांच्या काकीने त्यांना शिक्षक होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, प्रवीण मोठ्या मेहनतीनं शिक्षक झाले. परंतु तोपर्यंत त्यांच्या मनात सतत एक सल होती.
अगदी शालेय शिक्षणापासून डीएडपर्यंत आपण पुरुष नसून स्त्री असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होत होती. परंतु याबाबत ते कोणाला सांगू शकत नव्हते. त्यांची आतल्या आत घुसमट व्हायची. जसजसं वय वाढत होतं तसतशा त्यांच्या भावना तीव्र होत होत्या. अखेर त्यांनी आपल्या मनातला आवाज ऐकला आणि स्वत:चं अस्तित्त्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करायचं ठरवलं. मग प्रवीणची झाली रिया आळवेकर.

प्रवीण हे कुडाळच्या पाट गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तृतीयपंथी कल्याणकारी बैठकीत प्रथमच जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्यासमोर आपलं मन व्यक्त केलं. त्यानंतर प्रशासनाकडून त्यांना योग्य मदत मिळाली.
2019 साली प्रवीण रिया झाले. त्यांनी आपली शस्त्रक्रिया केली. परंतु त्यानंतरही ते पुरुषी वेशातच शाळेत शिकवायचे. सर्व धैर्य एकवटून अखेर त्यांनी आपल्या अस्तित्त्वाबाबत सर्वांना कळवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 2022 साली आपल्या शस्त्रक्रियेबाबत प्रशासनाला माहिती दिली. त्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी त्यांना मोलाचं सहकार्य केलं. मग रिया आवळेकर यांनी देशातल्या पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका होण्याचा मान मिळवला. अर्थात इथवरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता.

नेमकी काय होती भावना?

प्रवीण यांना आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात पावलोपावली बदल जाणवत होता. जन्मानं जरी ते पुरुष असले तरी आपण स्त्री आहोत याची जाणीव त्यांना सतत होत होती. मात्र याबाबत कोणाला सांगावं, सांगावं की नाही, अशा सगळ्या प्रश्नांचा मनात गोंधळ होता. 10 वर्षे त्यांनी मुलांना शिकवलं. अखेर, लहानपणापासून होणारी घुसमट, मनातली खदखद, शस्त्रक्रियेसाठीची हिंमत यापलिकडे जाऊन प्रवीण अर्थात रिया यांनी देशातल्या पहिल्या तृतीयपंथी शिक्षिका होण्याचा मान मिळवला.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.