जगप्रसिद्ध 'तारा पान' पोरके झाले: छत्रपती संभाजीनगरचा 'तारा' शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर : कधी कोणी विड्याचे पान रडताना पाहिलेय का? नाही न? ते तर आपली जिभ रंगवत असते. पण, हे पान मात्र गुरुवारी ढसाढसा रडले. का माहितीये, त्याला देशभर मोठी प्रसिद्धी मिळवून देणारे हात आज शांत झाले.
रोज प्रेमाने त्याच्यावर हात बोट फिरवणारे हात अचानक थांबले होते. काथ, चुना, बेळगाव चटणीपासून ते चॉकलेट फ्लेवरपर्यंत सर्वच काही छोट्यामोठ्या रसदार पदार्थांच्या प्रेमाचा वर्षाव आता त्याच्यावर होणार नव्हता. गुरुवारी तारा पानचे सर्वेसर्वा शरफुद्दीन सिद्दिकी यांचे निधन झाले. 'ते' पान सांगत होते 'मला जगभर प्रसिद्धी मिळवून देणारे हात थांबल्यामुळे मी आज पोरका झालोय. शरफूभाईंचा 'तो मिडास टच' आता मला लाभणार नाहीये. 'लिगसी' काय असते ती मी एक पान म्हणून अनुभवली आहे, पाहिली आहे. अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या पानटपरीच्या व्यवसायाला जगभरात प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या शरफूभाईंच्या प्रेमात मी होतो अन् पुन्हा ढसाढसा ते पान रडू लागले. हुंदके देत हळूहळू भूतकाळात रमले व शरफूभाईंची कहाणीच सांगू लागले.
ते म्हणाले, शरफूभाईंच्या मेहनतीने मला त्यांनी एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. परंपरा वेगळी होती. ते पान म्हणाले, मला सजवताना विशेष कस्तुरी (किंमत रु. ७० लाख किलो), केशर (किंमत रु. २ लाख किलो), गुलाबाचा अर्क (किंमत रु. ८००००, किलो), एक विशेष द्रव सुगंध आणि एक सुपर सिक्रेट घटक वापरत. रात्रीच्या जेवणानंतर रोज हजारो लोक अगदी महिलादेखील मला घेण्यासाठी तारावर येतात. कारण, मला सजवताना स्वादिष्ट चव आणि विविधतेमुळे.
ते पान पुढे म्हणाले, शरफुद्दीन सिद्दिकी यांनी १९६८ मध्ये एका छोट्याशा दुकानातून सुरुवात केली. भाईंचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी ते मुंबईला गेले, पण त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर ते शहरात परतले आणि त्यांच्या आईच्या सल्ल्यानुसार त्यांनी तारा पान सेंटर सुरू केले. पान सेंटरसाठी पैसे देण्यासाठी तिने सोन्याचे दागिने विकले. तेव्हा ५ ते १० रुपयांना एक पान ते विकत. आता काळानुरूप माझे दरही बदलले असले तरी चव मात्र कायम आहे. यामुळे शरफूभाईंकडे आजही ५ हजार ते १५ हजारांपर्यंत विविध पान अर्थात चवीनुसार मिळते. म्हणूनच आज आम्हाला अभिमान आहे की, आमची चव चाखण्यासाठी शहरात जगभरातून मागणी असते. अनेक सिनेस्टार, विविध राजकीय पक्षांतील नेते इथे येतात. शरफूभाईंच्या रूपात 'तारा' जरी निखळला असला तरी ही 'परंपरा' त्यांची मुले पुढे नेतील असे सांगत ते पान पुन्हा हुंदके देत रडू लागले, पण त्याचा पोरकेपणाचा भाव लपला नाही.
शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर
उस्मानपुरा येथील तारा पान सेंटरचे मालक शरफोद्दीन सिद्दिकी (वय ७४) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अन्सार, सात मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. रात्री दहा वाजता उस्मानपुरा येथील जामा मशीद येथे नमाज -ए- जनाजा अदा करण्यात आली. शहानूरमियां दर्गा परिसरातील कब्रस्तान येथे दफनविधी करण्यात आला. शहरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. विविध सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असायचा. दुपारी त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर धडकताच त्यांच्या निकटवर्ती आणि हितचिंतकांनी निवासस्थानी गर्दी केली होती. संध्याकाळी अंत्यसंस्कारावेळी लोकमतचे एडिटर ईन चीफ राजेंद्र दर्डा, माजी खासदार इम्तियाज जलील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख युसूफ, डॉ. जितेंद्र देहाडे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.