Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपचा बालेकिल्ला ढासळला! बीड जिल्हाध्यक्षांचा राम राम; कोणी उमेदवारी मागेना, इच्छुकांची संख्याही घटली

भाजपचा बालेकिल्ला ढासळला! बीड जिल्हाध्यक्षांचा राम राम; कोणी उमेदवारी मागेना, इच्छुकांची संख्याही घटली

 
बीड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, तिकीट मिळाले की विजय निश्चित अशी ताकद होती, जिल्हाध्यक्षपद मिळवण्यासाठीसुद्धा शर्थीचे प्रयत्न कराके लागत होते. अशा एकेकाळी बलाढ्य असलेल्या भाजपला बीडमध्ये मोठी उतरती कळा लागली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीसाठी कोणी प्रयत्न करेना, भाजपसाठी जागा सोडा म्हणून मागणी होईना. त्यामुळे विद्यमान आमदारानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला राम राम ठोकला आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र मस्के यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पदाचा सन्मान राखत पक्षासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पक्ष नेतृत्वाने कामाची दखल घेतली नाही. उलट दुजाभाव केला. विरोधकांची मर्जी राखली. विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न झाले. सत्ता मिळूनही भाजपच्या निष्ठावंतांची गोची करण्याचे काम या अडीच वर्षांत झाले, असा आरोप त्यांनी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजेंद्र मस्के हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. एकीकडे राजेंद्र मस्के यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात असताना दुसरीकडे भाजपकडून निवडणूक लढवण्यास कोणी इच्छुक नाही. उमेदवारी मागत नाही. कुणी मतदारसंघ भाजपला सोडा अशी मागणी करत नाही. उलट भाजपचे गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, माजलगावचे मोहनराव जगताप, भाजपचे रमेश आडसकर, भीमराव धोंडे हेही भाजपपासून लांब पळत आहेत. एकेकाळी बीड जिह्यामध्ये भाजप पाच जागेवर निवडणूक लढवत असे. यंदा कशाबशा दोन जागा येत असल्याने भाजपचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा होत आहे.

''शिवसंग्राम'च्या ज्योती मेटे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष-खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. शिवसंग्राम संघटना समाजकारण करते. समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी हा पक्ष प्रवेश असल्याचे यावेळी ज्योती मेटे म्हणाल्या. विनायक मेटे यांच्या निधनानंतर शिवसंग्राम पक्षाची धुरा सार्वमताने ज्योती मेटे यांच्याकडे सोपवण्यात आली. पक्षाने सांगितलेली सर्व जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडू, असा विश्वास त्यांनी पक्ष प्रवेशानंतर व्यक्त केला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.