Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार

दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
 

ठाणे : कल्याण तालुक्यातील म्हस्कळ गावात गेल्या अनेक महिन्यांपासून इलाइट नशामुक्ती केंद्र नावाने अनधिकृत नशामुक्ती केंद्र सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर, या ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी येणाऱ्या रुग्णांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडून प्रतिमहिना हजारो रुपयेदेखील वसूल केले जात असल्याचे समजते आहे.

या ठिकाणी ठाण्याहून दारू सोडविण्यासाठी आलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी कल्याण पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी गंभीर मारहाण आणि प्राणघातक हल्ल्याप्रकरणी नशामुक्ती केंद्रातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून सविस्तर तपास सुरू आहे.

कल्याण तालुक्यातील म्हस्कळ गावात इलाइट नशामुक्ती केंद्र आहे. मागील काही महिन्यांपासून या नशामुक्ती केंद्रात प्रतिमहिना सुमारे १५ ते २० हजार रुपये भरून दारू, तसेच इतर नशेच्या आहारी गेलेल्या नागरिकांना भरती करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. कल्याणसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात अनधिकृतपणे आणि जिल्हा समाज कल्याण विभागाला अंधारात ठेवून नशामुक्ती केंद्राचा हा कारभार सुरू होता. या केंद्रात ठाणे येथील कोलशेत भागात राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला दारूचे अधिक व्यसन लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी या नशामुक्ती केंद्रात मागील महिन्यात दाखल केले. काही दिवसांपूर्वी या तरुणाचे कुटुंबीय त्याचे कपडे देण्यासाठी त्याला केंद्रात गेले असता त्या तरुणाच्या पायावर आणि पोटावर अनेक जखमा दिसून आल्या. याबाबत सविस्तर चौकशी केली असता आपल्याला केंद्र सांभाळणाऱ्या आणि रुग्णांची देखभाल करणाऱ्या तीन तरुणांकडून बेदम मारहाण झाल्याचे त्याने सांगितले.

याबाबत केंद्रातील संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली असता त्यांनी कुटुंबीयांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर संबंधित तरुणाला केंद्रातून घरी आणले. याबाबत जिल्हा समाज कल्याण विभागाशी संपर्क साधला असता या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यात येत असल्याचे उत्तर देण्यात आले.

तातडीने कारवाई करण्याची मागणी

मारहाण झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने येथील सीसीटीव्ही चित्रण तपासले असता, नशामुक्ती केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांना केवळ मारहाणच नव्हे, तर येथील लादी पुसणे, भांडी घासणे यांसारखी कामेदेखील जबरदस्तीने करून घेत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संपूर्ण केंद्रावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पीडित तरुणाच्या कुटुंबाकडून केली जात आहे. तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत या अनधिकृत केंद्रावर तातडीने कारवाई करण्याबाबत जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी जिल्हा समाज कल्याण विभागाला पत्र देऊन सूचित केले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.