सांगली : अनैतिक संबंधातून चुलतभावाकडून बहिणीचा खून
कवठेमहांकाळ : मोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे अश्विनी शिवाजी शिर्के (वय 21) हिचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी (दि. 23) घडला होता. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी केलेल्या तपासात ही आत्महत्या नसून, खून असल्याचे उघड झाले. अश्विनीचा सख्खा चुलत भाऊ हणमंत रामचंद्र शिर्के (वय 31, रा. मोरगाव) यानेच
अनैतिक संबंध लपविण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कवठेमहांकाळ येथील नरघोल वस्ती वरून बेलदार वस्तीकडे जाणार्या रस्त्यावर बुधवारी रात्री युवतीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. मृतदेहाजवळ विषारी द्रवाची बाटली सापडली होती. त्यामुळे प्रथमदर्शनी तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, जत येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक यांनी सखोल तपास करून दोन दिवसांतच गुन्हा उघडकीस आणला. युवतीस मृत अवस्थेत दवाखान्यात दाखल करणारा सख्खा चुलतभाऊ हणमंत शिर्के यानेच तिचा खून केल्याचे सिद्ध झाले. याबाबतची फिर्याद अश्विनीची बहीण सानिका हिने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संशयित हणमंत शिर्के याने अश्विनीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या विश्वासाचा गैरफायदा घेत अश्विनीसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. यानंतर गर्भपातासाठी त्याने अश्विनीला धमकावले. तिने गर्भपातास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून त्याने अश्विनीसह तिच्या गर्भास जीवे मारण्याच्या उद्देशाने अश्विनीस जबरदस्तीने मोटारीत (एमएच 10 डीव्ही 1127) बसवून नरघोल येथे नेले. मोटारीतच विषारी द्रव्य पाजून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने अश्विनी हिने स्वत:च विषारी द्रव्य प्राशन केल्याचे भासविण्यासाठी नरघोल वस्ती परिसरात रस्त्याकडेला माळरानावर मृतदेह टाकून तो पसार झाला. पोलिसांनी संशयित हणमंत याला अटक केली आहेे. अधिक तपास उपनिरीक्षक भापकर करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.