Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वतःच्या मालकीचा जमिनीचा तुकडा नसतानाही पूर्ण होईल घराचं स्वप्न; तुम्हाला माहितीय सरकारची ही योजना

स्वतःच्या मालकीचा जमिनीचा तुकडा नसतानाही पूर्ण होईल घराचं स्वप्न; तुम्हाला माहितीय सरकारची ही योजना
 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत देशातल्या लाखो लोकांना हक्काचं घर मिळालं आहे. गरिबांपासून ते मध्यम वर्गापर्यंतच्या नागरिकांचं घराचं स्वप्न पूर्ण व्हावं, यासाठी या योजनेतून निधी दिला जातो. 2015मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेत वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत; पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडादेखील नाही, अशा कुटुंबालादेखील या योजनेअंतर्गत स्वतःचं पक्कं घर दिलं जातं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 जून 2015ला पंतप्रधान आवास योजना सुरू केली. आर्थिक परिस्थितीमुळे ज्यांना स्वतःच्या मालकीचं घर होईल असं स्वप्नातही वाटणार नाही, अशा लोकांसाठी ही योजना उपयुक्त ठरली. दारिद्र्यरेषेखालच्या प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देणं, हे या योजनेचं प्रमुख उद्दिष्ट आहे. तसंच ज्यांचं स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न आहे, परंतु प्रत्यक्षात आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य होत नाही, अशांनादेखील या योजनेंतर्गत मदत केली जाते.

काय आहे योजना?

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून सरकार गरजू आणि गरीब वर्गाला आर्थिक मदत करते आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी घरांची व्यवस्था करते. या योजनेंतर्गत पात्र व्यक्तीला घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. शहरी आणि ग्रामीण भागातल्या पात्र व्यक्तींना स्वतःच्या मालकीचं घर घेण्यासाठी सरकारी मदत दिली जाते.

स्वतःच्या मालकीची जमीन नसेल, तरीही मिळू शकतं घर
 
पंतप्रधान आवास योजना- 3 अंतर्गत कोडर्मा इथे 120 घरं आणि झुमरी तलैया इथे 80 घरं बांधून ती भूमिहीन कुटुंबांना देण्यात आली आहेत. हे घर 333 स्क्वेअर फूटचं वन बीएचके असून, ज्याची किंमत अंदाजे 5.5 लाख रुपये आहे. तसंच या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी कर्ज दिलं जातं. ते हप्त्यांमध्ये परतफेड करतात. या योजनेचा लाभ घेतलेल्या एका लाभार्थ्यानं सांगितलं, की 'आम्ही गवताच्या छताच्या झोपडीत राहत होतो. पावसाळ्यात आमची झोपडी गळत असे. पावसाळ्यात आमची झोपडी पडणार तर नाही ना, अशी नेहमी भीती वाटत होती. परंतु आता आम्हाला स्वतःच्या मालकीचं घर मिळालं आहे.' आणखी एका लाभार्थ्यानं सांगितलं, की 'माझं उत्पन्न मर्यादित होते. जे काही उत्पन्न मिळत होते, ते सगळं कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खर्च होत होते. पीएम आवास योजनेंतर्गत मला घर बांधण्यासाठी 2 लाख 20 हजार रुपयांची रक्कम मिळाली आणि माझं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झालं.'

योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कोण करू शकतं अर्ज?
- अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिक असावी.
- अर्जदाराचं वय 18 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त असावं.
- अर्जदाराचं स्वतःचं घर नसावं.
- अर्जदाराकडे बीपीएल कार्ड असणं आवश्यक आहे
- कमी उत्पन्न असलेले लोक या योजनेसाठी पात्र मानले जातात.

पंतप्रधान आवास योजनेमुळे घराचं स्वप्न पूर्ण होत असल्यामुळे अनेकदा लाभार्थी वेगवेगळ्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानताना दिसतात.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.