'त्याग करून मुख्यमंत्रिपद दिलं...', शिंदेंना उद्देशून शाहांचं विधान, अर्थ काय?
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या सर्व 288 जागांवर मतदान पार पडणार आहे, तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झालेली असतानाच अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून महत्त्वाचं विधान केलं आहे.
'या देशात पीएम, सीएम, प्रांत ही तीनच महत्त्वाची पदं आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला,' असं सूचक विधान अमित शाह यांनी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे.
अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे वेगेवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाला किती जागा दिल्या जाणार? शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिलं जाणार का? असे प्रश्नही अमित शाह यांच्या या विधानामुळे उपस्थित होत आहेत.
शिवसेना शिंदे गटाने जागावाटपात 107 जागा मागितल्या आहेत. मात्र, त्यांना 80 ते 85 जागा देण्याबाबत भाजप तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, शिवसेना शिंदे गटाला किमान 90 ते 95 जागा भाजपकडून सोडण्यात येतील असा विश्वास त्यांच्या नेत्यांना असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.