Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास

निराधार दुर्गांची जीवनभरारी! बालगृहातील भगिनी ते अधीक्षिका; सांगलीच्या सपनाचा स्फूर्तिदायी प्रवास
 

बालगृहातील वातावरणात वाढलेली १८ वर्षानंतरची मुले, मुली शक्यतो बालगृहातच थांबायचा विचार करीत नाहीत. शिक्षण, लग्नाच्या निमित्ताने त्या कोंदट, बंदिस्त वातावरणातून बाहेर पडण्यासाठी पराकोटीचा आटापिटा करतात. मोकळेपणाने वावरण्याचं स्वातंत्र्य कुणाला नको असतं? पण, सांगलीची सपना अडुरकर त्याला अपवाद ठरली. तिचा बालगृहातील एक भगिनी ते बालगृह अधीक्षिकेपर्यंतचा प्रवास अनेकींसाठी स्फूर्तिदायी ठरला आहे.

बालगृहातील मुलींच्या आयुष्यात आपण आमूलाग्र परिवर्तन घडवून आणू शकतो का? मी त्यांच्यातीलच एक असल्याने कदाचित मी जास्त प्रकारे आमच्या मैत्रिणींना समजून घेईन किंवा चांगला विचार देण्याच्या नव्या वाटा उपलब्ध करू शकेन, असे मला राहून राहून वाटायचे. त्यातूनच मी संस्थेतच कामात विशेष रस घेऊ लागले. ही संस्था आपली आहे हे भाव दुणावले. मुलींचे मूड, त्यांचे गॉसिप, त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, आचार विचारांच्या हरकती पाहून आमच्या स्टाफशी एकूण मुली (त्या मीही असायचे) ज्या पद्धतीने रिॲक्ट व्हायच्या ते पाहून मला काहीतरी त्यांची तिसरी बाजू समजून घ्यावीशी वाटायची. म्हणूनच १८ वर्षानंतर मी संस्थेतून बाहेर पडल्यावर मानसशास्त्र हा विषय जाणीवपूर्वक घेतल्याचे सपना म्हणाली. सांगली येथील भगिनी निवेदिता संस्थेच्या बालगृहात वाढलेल्या सपनाचा शैक्षणिक संघर्ष १८ व्या वर्षी चालू झाला. बारावीनंतर संस्थेच्याच जरा दूरवर असलेल्या वर्किंग वुमन हॉस्टेलमध्ये राहून संस्थेची छोटी मोठी कामं करीत मानसशास्त्र ही पदवी तिने संपादन केली.

संस्थेच्या व बालगृहातील मुलींच्या कामाबाबतीत निष्ठा पाहून संस्थेने तिला पदवीच्या शेवटच्या वर्षीच संस्थेच्या अधीक्षकाचा पदभार सांभाळायची जबाबदारी दिली. मानधन तत्त्वावर काम करीत सपनाने आपले पदवी शिक्षण पूर्ण केलेच, त्या शिवाय ती पुढे सामाजिक कार्यकर्ताचे (MSW) शिक्षण घेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करीत आहे. तिच्या लेखी तिच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. तिला प्रत्यक्ष कामाचा अनुभव, महाविद्यालयीन शिक्षण, आणि सुरक्षित स्थैर्य अशा तीनही गोष्टी साध्य होत आहेत. विशेषतः ती म्हणते, 'लहानपणी आम्हाला जेंव्हा cwc किंवा मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर उभे करायचे तेव्हा मी खूप घाबरायचे. ते रागावतील का? आम्हाला संस्थेतील म्हणून कमी लेखतील का? नाना वैचारिक गोंधळ मनात धुमाकूळ घालत. त्यांची आमच्याकडे पाहण्याची दृष्टी वंचित घटक म्हणून असायची. त्यामुळेही भीती वाटायची. आता मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून संस्थेच्या अधीक्षक पदावर असल्याने माझ्याकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला आहे, खूप अभिमानाने ते माझ्याकडे पाहतात. कारण संस्थेतील अनेक मुलींना बाहेर पडायचे आहे आणि हिला मात्र संस्थेतच करिअर करायचे आहे, ही माझी मुलींच्या बाबतीतील आत्मियता पाहून त्यांनाही बरं वाटत आहे.'

बालगृहातील मुलींना समजून घेताना अनेक कसोट्या पार कराव्या लागतात. संस्थेच्या, cwc च्या आणि विभागाच्या अनेक नियम समजून घेऊन मुलींमध्ये वैचारिक विकास व्हावा म्हणून छोट्या छोट्या प्रश्नमंजुषा, गटचर्चा, उत्स्फूर्तपणे भाषण, गोष्टी सांगणे आदी स्पर्धात्मक उपक्रम राबवित असतात. त्याचे अर्थातच चांगले रिझर्ट तिला पाहायला मिळतात. मुलींच्या ठरलेल्या tv पाहण्याच्या वेळा, दुपारच्या विश्रांतीचे हक्काचे काही तास आता त्या तिला या उपक्रमांसाठी देऊ लागल्या आहेत. सपना म्हणते,' ही सुखाची गोष्ट मला खूप दिलासा देऊन जाते. मारून, धोपटून सांगण्याऐवजी मनोरंजनातून वैचारिक विकास कसा करायचा, हे फंडे मी शोधून काढत आहे. त्यासाठी प्रसंगी युट्युबवर, काही आर्ट रिल्सच्या माध्यमातूनही मुलींनी नेमकी काय पाहावं, बाहेर वावरताना फार भडक न दिसता कसं प्रेसेंटेबल असावं, पौगंडावस्थेतील स्त्री सुलभ भावनांना कसं समजून घ्यावं, गॉसिप करायचंच असेल ते गंभीर कसं होऊ शकते याचे धडे त्या गिरवत असतात.'
सपना म्हणते, 'मी अगदीच २ वर्षांची होते तेव्हा आई वारली आणि वडील कुठेतरी दुसरीकडे निघून गेले. २ वर्षांची असताना आमच्या घरात एकटीला पाहून शेजारी राहणाऱ्या एका मुस्लीम कुटुंबाने माझा दोन-तीन वर्ष सांभाळ केला. १५ वर्षांनी त्यांची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी ही माझी कथा सांगितली. आज ते कुटुंब जेव्हा मला भेटायला येते किंवा त्यांच्या सणांमध्ये नेते मला बोलावतात तेव्हा त्यांनाही माझ्याबद्दल कौतुक वाटते.'

सपना स्पर्धा परीक्षांची तयारी करीत MSW पूर्ण करीत असली तरी तिला तिची संस्था अजिबात सोडायची नाहीये. कारण या संस्थेने, इथल्या अधिकाऱ्यांनी, सांगलीतील सर्व महिला बाल विकासच्या अधिकाऱ्यांनी, CWC सदस्यांचे तिचे एक स्वतःचे कुटुंब झाले आहे. ती म्हणते, 'त्यांनी मला वेगवेगळ्या टप्प्यावर समजावून घेऊन शिक्षण दिलं आहे. वेगवेगळ्या संस्थांच्या कामांचा आढावा घेऊन, तेथील चांगल्यात चांगलं जे काही आहे ते स्वतःमध्ये आत्मसात करून मला आमच्या संस्थेतील मुलींना बेस्ट काय देता येईल हेच विचार माझ्या करिअरच्या पुढील वाटा ठरवतील. आपल्या घरातीलच बहिणींना सपनाचा आधार असावा, हेच सपनाचे स्वप्न आहे.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.