कर्ज न फेडलेल्या मुलीला डिजिटल अरेस्ट; विवस्त्र होण्यास सांगत काढला व्हिडीओ
गोरखपूर : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत असलेल्या व कर्ज फेडू न शकलेल्या नागालँडच्या एका मुलीला बँक, पोलिस अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अटक केली. ऑनलाइन जामिनाच्या नावावर तिच्याकडून पैसे मागितले व विवस्त्र होण्यास सांगितले.
त्याचा व्हिडीओ तयार झाल्यावर सायबर गुन्हेगारांनी तिच्याकडून पैसे उकळले. मात्र हा सारा बनाव असल्याचे लक्षात येताच त्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
या मुलीला रविवारी मोबाइलवर एक कॉल आला. समोरच्या व्यक्तीने तिला सांगितले की, मी बँक अधिकारी बोलत आहे. तू बँकेतून घेतलेले कर्ज फेडले नाही. त्यामुळे तुझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. कर्ज न फेडल्यास तुला अटक होईल. त्यानंतर तिला व्हॉट्सॲपवर दुसरा कॉल आला. त्यातील पोलिस गणवेशातील एकाने सांगितले की, तुझ्यावर हैदराबाद येथे एफआयआर दाखल झाला असून, तू तिथे येऊन लवकरात लवकर जामीन मिळव. अन्यथा तुला अटक होईल. त्यावर मी तिथे सध्या येऊ शकत नाही, असे तिने सांगितले. (वृत्तसंस्था)
नेमके काय केले ?
भेदरलेल्या मुलीला व्यक्तीने सांगितले की, ऑनलाइन जामिनासाठी ३८ हजार रुपये ट्रान्सफर कर. तिने ते करताच त्याने तिच्या छातीवरील टॅटू दाखवायला सांगितला.
त्यामुळे तुझी ओळख आम्हाला पटेल व जामीन मिळण्यास सोपे होईल. त्या मुलीने त्यांच्या सांगण्याप्रमाणे करताच त्या व्हिडीओच्या आधारे त्यांनी तिला ब्लॅकमेल करायला व तसेच तिच्याकडून एक लाख रुपये मागायला सुरुवात केली. तेव्हा आपण फसविले गेलो आहेत हे लक्षात आले.
धमकी काय दिली?
- तुझा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी मुलीला भामट्यांनी दिली.
- हा व्हिडीओ सर्वत्र झळकला तर तू कोणालाही तोंड दाखवू शकणार नाहीस, अशीही धमकी त्यांनी तिला दिली.
- त्यांनी मागितलेले पैसे देण्यास मुलीने असमर्थता व्यक्त केली. त्यावर आता परिणाम भोगण्याची तयारी ठेव, असा इशाराही भामट्यांनी दिला.
१७ जणांना अटक
- देशभरात लोकांना डिजिटल अरेस्ट करण्याचे थोतांड रचणाऱ्या व लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने तैवानच्या चार नागरिकांसह १७ जणांना अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी, बेहिशेबी मालमत्ता व अन्य प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये एखाद्या व्यक्तीला अटक करण्यात येणार आहे, असे त्याला व्हिडीओ कॉलद्वारे पटवून दिले जाते.
- या गोष्टीवर त्याचा विश्वास बसल्यानंतर त्याची फसवणूक केली जाते. या प्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, ओडिशा येथे धाडी टाकून आरोपींना अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.