हर्षवर्धन पाटलांना भाजपने काही कमी केलं नाही; पक्षानेही विचार करावा माणसं का टिकवू शकलो नाही?
नांदेड: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. त्यांच्या शरद पवार गटातील प्रवेशावर भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार होणं यातच सगळं आयुष्य आहे का? नातीगोती, ध्येय, विचार आणि अडीच वर्षांचे सरकार आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना देण्यात भाजपने काही कमी केलं नाही, असंही पाटील म्हणाले. त्यासोबतच माणसं का टिकवू शकलो नाही, याचा पक्षानेही विचार करावा, असंही पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने पक्षांतर्गत खदखद बाहेर आली असल्याची चर्चा आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटलांसारखे जे नेते पक्षात आले त्यांच्या संस्थांचा मोठा व्याप असतो. त्या व्यापामध्ये विशिष्ट पोझिशन नाही राहिली की प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून त्यांनी शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला असला पाहिजे. पण आम्ही ज्या संस्कारात वाढलो तो संस्कार आम्हाला जिना यहाँ, मरना यहाँ अशी शिकवण देतो असेही पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, इंदापूरची जागा महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाईल हे स्पष्ट आहे. विद्यमान आमदार जे आहेत ते ती जागा लढवतील. मग आपल्याला लढवायला मिळणार नाही. अशा मानसिकतेतून हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचे पाटील म्हणाले.भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जेव्हा युतीतोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्या वेळेला माझं म्हणणं होतं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर मागा, भांडा, सरकारमध्ये सहभागी होऊ नका, पण दुसरीकडे जाऊ नका. दुसरीकडे जाऊन तुम्हाला फक्त मुख्यमंत्रीपद मिळेल पण त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्राच काही पडलं नव्हतं, असं म्हटलं जाईल. हर्षवर्धन यांना मित्र म्हणून सल्ला दिला आमदार होणं यातच सगळं आयुष्य आहे का ?
नातीगोती, ध्येय, विचार याही महत्त्वाच्या गोष्टी असतात. तुम्हाला अडीच वर्षांच्या सरकारच्या काळात पक्षाने काही कमी दिलं नाही. तुमच्या संस्था टिकवण्यासाठी, साखर कारखान्याला कर्ज देणे हे सर्व दिलं. पण तरी हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आमच्या मनात कोणतेही कटुता नाही, आम्हीच विचार केला पाहिजे एखाद्या माणसाला आम्ही कसं टिकून धरू शकलो नाही. असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.