Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भारतीय शास्त्रज्ञांनी केली कमाल, कॅन्सर संशोधनात केलं हे जगावेगळं काम!

भारतीय शास्त्रज्ञांनी केली कमाल, कॅन्सर संशोधनात केलं हे जगावेगळं काम!
 

जीवनशैलीतील बदलांमुळे अनेक नवनवे आजार येत आहेत, त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रगतीमुळे उपचारांच्या आधुनिक पद्धतीही विकसित होत आहेत. आयआयटी कानपूरमधील एका टीमने तोंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी एक अनोखे उपकरण तयार केले आहे.

या उपकरणामुळे केवळ एका मिनिटात कॅन्सरचे निदान करता येऊ शकेल. 'एबीपी'ने त्याबाबत वृत्त दिले आहे. कर्करोगाचे निदान लवकर झाले तर अनेक प्रकरणांमध्ये आजार बऱ्याच अंशी बरा करता येऊ शकतो. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे आता ते शक्यही होऊ लागले आहे. यात अजूनही संशोधन सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयआयटी कानपूरने एक उपकरण तयार केले आहे. तोंडाच्या कॅन्सरचे निदान करण्यासाठी ते उपकरण काम करेल. विशेष म्हणजे हे उपकरण केवळ 60 सेकंदात रिपोर्ट देईल व त्यावरून निदान करणे सोपे होईल.

आयआयटी कानपूरमधील केमिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक जयंत कुमार सिंह यांच्या मदतीने स्कॅन जिनी या कंपनीने हे उपकरण तयार केले आहे. ते तयार करण्यासाठी प्राध्यापक सिंह व त्यांच्या टीमला सहा वर्षे लागली. हे उपकरण टूथब्रशच्या आकाराइतके लहान असल्यामुळे ते कुठेही घेऊन जाता येणे शक्य आहे. या उपकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कॅन्सर कोणत्या स्टेजवर आहे, हेदेखील त्याद्वारे समजते. साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकेल.
या उपकरणात हाय क्वालिटी कॅमेरा आणि एलईडी लावण्यात आलेला आहे. कॅमेऱ्याच्या मदतीने तोंडाच्या आतले फोटो घेण्यात येतात व त्यावर आधारित सखोल रिपोर्ट मोबाईलवर पाठवला जातो. हे उपकरण स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा आयपॅडशी कनेक्ट करता येऊ शकेल. या उपकरणाला पॉवर बॅकअपही देण्यात आलेला आहे. तसेच आरोग्याबाबतची हिस्ट्री जमा करण्याची त्यात क्षमता आहे. या उपकरणाने निदान करताना रुग्णांना तोंडात कोणतीही इजा होत नाही की दुखतही नाही.

आयआयटी कानपूरकडून या उपकरणाची चाचणी घेतली गेली आहे. त्याकरता कॅम्प लावून अंदाजे तीन हजार लोकांची या उपकरणाच्या साह्याने तपासणी करण्यात आली. फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार, खासगी कंपनीतले नोकरदार अशा विविध लोकांचा त्यात समावेश होता. या तपासणीमध्ये 22 वर्षांपर्यंतच्या तरुणांमधील तोंडाच्या कॅन्सरचे निदानही झाले.
या उपकरणाची किंमत दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत असेल असे प्राध्यापक जयंत सिंह यांचे म्हणणे आहे. त्याचे कारण या उपकरणासाठी लागणारे विविध भाग परदेशातून मागवावे लागणार आहे. हे एक उपकरण एका दिवसात 300 लोकांची चाचणी घेऊ शकते. तसेच एकूण पाच लाख लोकांची चाचणी घेण्याची एका उपकरणाची क्षमता असेल. कॅन्सरचे निदान लवकर व्हावे, यासाठी वैद्यकीय क्षेत्रात खूप संशोधन सुरू आहे. अशा उपकरणांमुळे त्यासाठी निश्चितच मदत होणार आहे.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.