लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १८ ठिकाणी सभा झाल्या, त्यातील १४ ठिकाणी पराभव : शरद पवार
सांगली : लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात १८ ठिकाणी सभा झाल्या, त्यातील १४ जागांवर भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे आमची मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती असेल की, त्यांनी विधानसभा निवडणुकवेळी महाराष्ट्रात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. आमच्यासाठी त्या फायद्याच्या ठरतील, असा चिमटा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत काढला.
अमित शहा यांनी उद्धव ठाकरे व माझ्यावर लक्ष ठेवण्याची सूचना भाजप नेत्यांना केली आहे. पक्ष फोडण्याचे आवाहन ते जाहीर सभेतून करताहेत. देशाचे गृहमंत्रीच कायदा व सुव्यवस्थेविरोधात बोलत असतील तर या सरकारची भूमिका काय आहे, हे सांगायची गरज नाही.असे सांगून पवार म्हणाले, जातीय व धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी समविचारी पक्ष, चळवळी व संघटनांनी एकसंधपणे याविरोधात लढायला हवे.
मराठा आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, मराठ्यांना आरक्षण मिळावे अशा प्रकारची भावना लोकांच्या मनात आहे. ती चुकीची नाही. मात्र हे करत असताना इतरांना जे मिळते त्याचेही रक्षण करणे आवश्यक आहे. सध्या देशात आरक्षण मर्यादा ५० टक्क्यावर आहे,भले ती ७५ टक्क्यांपर्यंत गेली तरी चालेल,पण आरक्षण दिले जावे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पवार म्हणाले की, उशीरा का होईना एक चांगला निर्णय झाला. आजवर ज्यांनी मराठीत दर्जेदार लेखन केले व नव्या पिढीतील साहित्यिकांना काही लिहायचे असेल तर त्यांना या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल. जागतिक स्तरावर आपले साहित्य नेण्याचा मार्गही गवसला आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचे याबाबत अभिनंदन करतो.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी शाळांची संख्या कमी होत आहे. ही चिंतेची बाब नाही का? पत्रकारांच्या या प्रश्नावर बोलताना खासदार पवार म्हणाले,ही निश्चितच चिंतेची बाब आहे.प्राथमिक, माध्यमिक शाळांची स्थिती चिंताजनक आहे.मुलांची संख्या ही कमी झाली आहे.त्यामुळे शिक्षकांची संख्या ही कमी करावी लागत आहे. मराठी भाषेच्या दृष्टीने ही अत्यंत चिंताजनक अशी बाब आहे याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करुन यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात मुलींच्यावर अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना , त्यावर उपाययोजना करण्याऐवजी हे सरकार 'लाडकी बहिण योजने'त गुंतले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या अनेक योजना थंडावल्या आहेत. कित्येक हॉस्पिटलना सरकारकडून निधीच गेलेला नाही, कॅन्सर रुग्णालयासह इतर रुग्णालयांचे ७०० कोटी रुपयांचे अनुदान देणे बाकी आहे. लोकसभे प्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकाही महाविकास आघाडी एकसंघपणे लढेल.जागा वाटपाच्या निर्णय आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संबंधित पक्षाचे नेते मंडळी एकत्र बसून घेतील.
आरक्षण मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढवा
तमिळनाडूमध्ये आरक्षण ७८ टक्क्यांपर्यंत होते. महाराष्ट्रात ७५ टक्क्यांपर्यंत का होऊ शकत नाही? केंद्र शासनाने कायद्यात दुरुस्ती करुन आरक्षण टक्का वाढविल्यास मराठा समाजासह सर्व समाजघटकांचे प्रश्न सुटू शकतात. याबाबतीत आम्ही त्यांना पाठींबा देऊ.
प्रकाश आंबेडकरांना एकही जागा जिंकता येत नाही
मराठा आरक्षणाला पाठींबा दिल्याने शरद पवार आता मराठ्यांचे नेते आहेत, हे सिद्ध झाले, अशी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यावर पवार म्हणाले की, ज्यांना राज्यात एकही जागा निवडून आणता येत नाही, ते प्रसिद्धीसाठी अशी टीका करीत असतात.
पंतप्रधानांचाच रेवडी संस्कृतीला विरोध
महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण या फुकटच्या योजनांविरोधात भाजपाच्या नितीन गडकरींनी केलेले विधान योग्यच आहे. त्यांना प्रशासकीय वास्तव माहित आहे. केवळ त्यांनीच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनीही अशा संस्कृतीला ‘रेवडी’ संबोधत त्याला विरोध केला होता, याची आठवणही खासदार शरद पवार यांनी यावेळी करुन दिली.
येणाऱ्या लोकांचे स्वागत
भाजपाचे हर्षवर्धन पाटील आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी राजे देशमुख पुन्हा राष्ट्रवादी येत आहेत या पत्रकारांच्या प्रश्नांवर खासदार शरद पवार म्हणाले,
काही लोकांचा रस्ता चुकला होता. त्यांना त्याचा पश्चाताप झाला. आता ते योग्य रस्त्यावर येऊ पाहताहेत. आम्ही त्यांचे स्वागत करु.
वय वाढेल तशी उर्जा वाढतेय
पत्रकारांनी त्यांच्या राजकीय उर्जेबाबत विचारल्यानंतर ते म्हणाले, वय वाढेल तशी उर्जा वाढतेय. त्यामुळे पक्षीय कार्य चांगल्या पद्धतीने सुरु आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.