येडेमच्छिंद्र, जत इस्लामपूर येथे अवैध दारूसाठा जप्त, तिघांना अटक १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : जिल्ह्यातील इस्लामपूर, येडेमच्छिंद्र, जत येथे तीन ठिकाणी छापे टाकून अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली.
अमोल सूर्यकांत शिंदे (वय ३१, रा. येडेमच्छिंद्र), मनोज दत्तात्रय शिंदे (वय ४३, रा. इस्लामपूर), चेतन श्रीकांत यलगार (वय २१, रा. माडग्याळ, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या दारूसाठा करणारे तसेच तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक विटा उपविभागात अवैध मद्यसाठा केलेल्यांचा शोध घेत होते.
त्यावेळी येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथे एका हॅटेलच्या पिछाडीस अमोल शिंदे याने अवैध दारूसाठा केल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे छापा टाकून दारूसाठा जप्त केला. तसेच शिंदे याला अटक केली. त्याच्याविरोधात चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच इस्लामपूर येथील शिराळा नाका येथे दुचाकीवरून पोत्यातून विदेशी दारूची वाहतूक करताना मनोज शिंदे याला पकडले. त्याच्याकडून दारूसाठा तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत-वळसंग रस्त्यावरील एका महाविद्यालयाजवळ दुचाकीवरून विदेशी दारूची वाहतूक करताना चेतन यलगार याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, सूर्यकांत साळुंखे, सूरज थोरात, सोमनाथ पतंगे, अरूण पाटील, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, आमसिद्धा खोत, अमर नरळे, सोमनाथ गुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.