सांगलीत काँग्रेस एकसंध लढेल पृथ्वीराज पाटील ः आज शक्तीप्रदर्शनाने अर्ज भरणार
सांगली ः सांगली विधानसभा मतदार संघात काँग्रेसमध्ये उमेदवारासाठी स्पर्धा झाली, त्यातून मतभेदही झाले, मात्र आपल्या पक्षात कधीच मनभेद होणार नाही. काँग्रेस एकसंधपणे लढेल. सर्व नेत्यांचा हात आपल्या पाठीवर असेल आणि जनतेची साथही मिळेल, असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री. पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत संवाद साधला. उद्या (ता. २९) ते शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गणपती मंदीरपासून रॅली सुरू होईल आणि काँग्रेस कमिटीसमोर काँग्रेसची सभा होणार आहे. या सभेला आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील उपस्थित राहणार आहेत. त्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले.
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘वसंतदादा, पतंगराव कदमसाहेब, गुलाबरावसाहेब, प्रकाशबापू, मदनभाऊ या धुरीणांनी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत उभी केली. सामान्य कार्यकर्त्याला बळ दिले. त्यांच्या विचाराने आपणाला पुढे जायचे आहे. त्यांच्या विचाराचा वारसा सांगणारा प्रत्येजकण या लढाईत आपल्या सोबत असेल. आपला विरोधक भाजप आहे. गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी विकासाचे फुगे उडवला. तो फुगा यंदा फोडायचा आहे. दोन पूल आणि चार रस्ते म्हणजे विकास नसतो.पायाभूत सुविधांतून शहराचा रचनात्मक विकास, तरुणांच्या हाताला काम, महिला सक्षमीकरण आणि ब्रँड सांगलीच्या माध्यमातून कृष्णाकाठच्या मातीला जगाशी जोडण्याचा संकल्प घेऊन आपण पुढे जाणार आहोत. काँग्रेसच्या विचाराचा प्रत्येक माणूस ही आपली ताकद आहे.’’ पृथ्वीराज पाटील यांनी रविवारी रात्री वांगी येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या ‘लोकतीर्थ’ समाधीस्थळाचे दर्शन घेतले. आमदार विश्वजीत कदम यांची भेट घेतली. आज सकाळी सांगलीत वसंतदादा पाटील, प्रकाशबापू, मदनभाऊ, विष्णूअण्णा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, चिंतामणराव पटवर्धन, अण्णासाहेब पत्रावळे, क्रांतिसिंह नाना पाटील, अहिल्यादेवी होळकर, महात्मा गांधी, पंडीत नेहरू, कर्मवीर भाऊराव पाटील, राजारामबापू पाटील, गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.