Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, एक कोटी मिळवा', करणी सेनेची घोषणा; कारण काय?

'लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, एक कोटी मिळवा', करणी सेनेची घोषणा; कारण काय?


बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला. सलमान खानच्या मागे हात धुवून लागल्यानंतर त्याच्या टोळीने बाबा सिद्दिकी यांची हत्या केली.

इतरांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईलाच आता जीवे मारण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना एक कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून ही घोषणा केली आहे.

राज शेखावत म्हणाले की, लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर कोणत्याही पोलिसाने केल्यास त्याला बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. तसेच केंद्र आणि गुजरात सरकारने बिश्नोईला सुरक्षा पुरविल्याबद्दल करणी सेनेने टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी सध्या गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. एप्रिमल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणातही त्याचे नाव घेण्यात आले होते. मात्र तेव्हा मुंबई पोलिसांना त्याची कोठडी मिळाली नव्हती.

म्हणून बिश्नोईला मारण्याची धमकी

राज शेखावत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बिश्नोईच्या डोक्यावर बक्षीस जाहीर करण्याचे कारण सांगितले. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खून केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात करणी सेनेचा राग आहे. करणी सेनेचे प्रमुख असलेल्या सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांचीही हत्या झाल्यानंतर बिश्नोई टोळीकडून याची जबाबदारी घेतली गेली होती. शुभम लोणकरने फेसबुकवर पोस्ट टाकून जाहीरपणे हत्येची जबाबदारी घेतली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, नव्वदच्या दशकात ज्याप्रकारे दाऊद इब्राहिमने त्याच्या टोळीचा विस्तार करत दहशत निर्माण केली होती. त्याचप्रकारे बिश्नोई टोळीही भीती बसविण्याचा प्रयत्न करत आहे. या टोळीचे देशभरात ७०० शूटर्स असून त्यापैकी एकट्या पंजाबमध्ये ३०० शूटर्स असल्याचे सांगितले जाते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.