Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धाकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारण

ठरलं.. निलेश राणे BJP सोडणार! धाकट्या भावाला पक्षाने तिकीट दिल्यानंतर...; फडणवीसांचं नाव घेत सांगितलं 'खरं' कारण

 
 
महाराष्ट्रामध्ये आजपासून विधानसभेचे उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. अद्याप महायुती मविआचे उमेदवार किंवा जागावाटप झाले नाही. महायुतीत भाजपने 99 जागांवर उमेदवार दिले आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 18 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही त्यामुळे जागा कोणाला आणि उमेदवार कोण हा प्रश्न इच्छुकांना पडला आहे. वंचित बहुजन आघाडी आणि परिवर्तन महाशक्तीकडून ही उमेदवारांची घोषणा झाली आहे. पण सत्तेत असलेले किंवा विरोधात बाजू लढवत ठेवलेलं युती आणि आघाडीचे अर्ज भरण्याचे बिगूल कधी वाजणार हा प्रश्न कायम आहे. असं असतानाच मोठ्या प्रमाणात पक्षांतरे होत आहेत. अशातच आता माजी मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणेंच्या थोरले पुत्र निलेश राणेंनी एक मोठी घोषणा केली आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी देणार

20 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीने जारी केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये कणकवली मतदारसंघामधून नितेश राणेंना उमेदवारी जाहीर केली. नितेश राणे हे कणकवलीचे विद्यमान आमदार आहेत. नितेश यांचे वडील नारायण राणे हे विद्यमान खासदार आहेत. असं असतानाच भाजपामध्ये असलेले नितेश राणेंचे थोरले बंधून निलेश राणे सुद्धा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र महायुतीमधील जागा वाटपानुसार कुडाळ-मालवण मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडण्यात आला आहे. म्हणूनच कुडाळ-मालवण मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत असलेल्या निलेश राणेंनी भारतीय जनता पार्टीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: निलेश राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

राणे पिता-पुत्राचा आग्रह

निलेश राणेंना भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी राणे पिता पुत्रांनी भाजप नेत्यांकडे मागील काही काळापासून सातत्याने आग्रह करत होते. मात्र, शिंदेंची शिवसेना या जागेवरील आपला दावा सोडण्यास तयार नसून या जागेवर लढण्यासाठी निलेश राणेंनी पक्षात प्रवेश करावा असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडण्यात आला. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेटीदरम्यान निलेश राणेंनी कुडाळ-मालवणमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवावी, या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

भाजपा सोडताना काय म्हणाले निलेश राणे?

मागील काही दिवस अनेक चर्चा होत आहेत त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे, असं म्हणत निलेश राणेंनी एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली. "मी 2019 ला राणे साहेबांसोबत नितेश राणेसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत भाजपामध्ये आलो. मला भाजपामध्ये खूप आदर आणि प्रेम मिळाले. भाजपामध्ये मला शिस्त शिकायला मिळाली. फडणवीस यांनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळलं. आमचे जिवाभावाचे संबंध कायम राहतील," असं म्हणत निलेश राणेंनी म्हटलं आहे. तसेच, "उद्या 23 तारखेला मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातले सहकारी माझा प्रवेशासाठी येणार आहेत माझा प्रवेश नक्की झालेला आहे," असं निलेश राणेंनी जाहीर केलं. 

निलेश राणेंविरोधात कोण?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निलेश राणेंना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल तर निलेश राणेंच्या पाठीमागे महायुती म्हणून खंबीरपणे उभं राहणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वैभव नाईक हे सध्या विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडे प्रभावी उमेदवार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालाचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे भाजपचे निलेश राणे उद्या म्हणजेच 23 तारखेला शिवसेनेत पक्ष प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. असं झालं तर नारायण राणेंचा एक पुत्र भाजपाकडून आणि दुसरा पुत्र शिंदेंच्या शिवसेनेकडून यंदाची विधानसभा लढणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.