मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 9 तास पाणी, जेवणाविना ठेवले ताटकळत; लाडक्या बहीणीचा मृत्यू
नांदेड : राज्य सरकारच्या 'लाडकी बहिण' योजनेमुळे अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला दीड हजार येत असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या योजनेची प्रसिद्धी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व महायुतीतील इतर नेते विविध कार्यक्रम घेत आहेत.
अशाच एका कार्यक्रमात गैरसोयीमुळे महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथे लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात जिल्हाभरातून हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रम सुरू असताना यातील शांता मोरे (वय 53) अचानक चक्कर येऊन पडल्या. तिला नातेवाईकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.
कार्यक्रमात ताटकळत ठेवल्याचा आरोप
लाडकी बहीण कार्यक्रमात 9 तास ताटकळत ठेवण्यात आले. याशिवाय पाणी आणि जेवणही मिळालं नाही. त्यामुळेच शांता याचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला. नांदेडपासून हाकेच्या अंतरावर भनगी गाव आहे. या गावातील जवळपास ५० हून अधिक महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या. यामध्ये शांताबाई मोरे यांचाही समावेश होता.
कार्यक्रम सकाळी दहाला अन् सुरु झाला पाचला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमाला येणार असल्याने आयोजकांनी सकाळी 10 वाजताच महिलांना कार्यक्रमस्थळी बोलावले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम खूप उशिरा म्हणजेच सायंकाळी 5 वाजता सुरू झाला. त्यातच रविवारी नांदेडमध्ये प्रचंड ऊन तापत होते. त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघत होत्या.
उपचारादरम्यान मृत्यू
नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शांताबाई यांची प्राणज्योत मालवली. आयोजकांनी तब्बल ९ तास ताटकळत ठेवल्याने शांताबाई यांनी काहीही खाल्ले नाही. त्यांना पिण्यासाठी पाणीही नव्हते म्हणून त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.