शालेय गणवेशाची बिले काढण्यासाठी 80 हजारांची घेतली लाच; जिल्हा समन्वयक, सहनियंत्रक 'लाचलुचपत'च्या जाळ्यात
कोल्हापूर : शाळांना गणवेश पुरवठा करणाऱ्या महिला बचतगटाचे बिल काढण्यासाठी ८० हजारांची लाच घेणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयकासह सहायक सहनियंत्रकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. उमेश बाळकृष्ण लिंगनूरकर (वय ४६, रा. सिद्धार्थनगर) याला रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले.
तसेच महामंडळाचा जिल्हा समन्वयक सचिन सीताराम कांबळे (वय ४५, रा. देवकर पाणंद, मूळ रा. पाचगाव) यालाही अटक करण्यात आली. महिला आर्थिक विकास महामंडळाचे नागाळा पार्क येथे कार्यालय असून, जिल्हा परिषदेच्या शाळांना गणवेश पुरवठा करण्याचे काम त्यांच्याकडे आहे. या महामंडळाच्या माध्यमातून तक्रारदाराच्या ओळखीतील बचतगटाला जिल्हा परिषदेच्या १९ केंद्र शाळांना गणवेश पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता.
त्याचे गणवेश तयार करण्याचे एकूण बिल १८ लाख ३५ हजार ८१४ रुपये महिला आर्थिक विकास महामंडळाकडून देणे होते. यापैकी १४ लाख ३५ हजारांचे बिल आदा करण्यात आले होते, तर उर्वरित बिलासाठी पाठपुरावा सुरू होता. तक्रारदाराने नागाळा पार्कातील महामंडळाच्या कार्यालयात सहनियंत्रक असलेल्या उमेश लिंगनूरकर याची भेट घेतली. त्याने महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे याला ८० हजार रुपये दिल्यानंतर उर्वरित बिल मिळेल, असे सांगितले होते.तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून हा प्रकार सांगितला. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने याची पडताळणी केली व रचलेल्या सापळ्यात संशयित लिंगनूरकर सापडला. ८० हजारांची लाच घेताना त्याला पकडण्यात आले. त्याने सचिन कांबळे याच्यासाठी रक्कम घेतल्याचे समोर आले. कारवाईत पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, कृष्णा पाटील यांनी सहभाग घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.