Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

70 अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कृषिमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश

70 अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी कृषिमंत्र्यांचे आयुक्तांना आदेश
 

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता असताना कृषिमंत्र्यांनी बदल्यांचा ७० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र कृषी सेवा गट 'ब'मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी मंत्रालयातून गेल्या काही दिवसांपासून प्राधान्याने फायलींची देवघेव मोठ्या प्रमाणात चालू आहे.

बदल्यांच्या यादीत राज्यातील जवळपास ७० अधिकाऱ्यांची नावे असून सर्व अधिकारी तालुका कृषी अधिकारी संवर्गातील आहेत. आचारसंहिता, निवडणूक या कामांमध्ये कृषी अधिकारी मोठ्या प्रमाणात गुंतून पडतील. याशिवाय रब्बी हंगामदेखील तोंडावर आहे. अशा वेळी बदल्यांची लगीनघाई करण्याची आवश्यकता नव्हती. मात्र, मंत्रालयातून बदल्यांसाठी संशयास्पदरीत्या दबाव आणला जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आयुक्तालयातील अधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, बदल्यांशी व्यक्तीशः आयुक्तांचा काहीही संबंध नाही. उलट कृषिमंत्र्यांनीच या बदल्यांबाबत तातडीने बैठक घेण्याचे आदेश आयुक्तांना दिलेले आहेत. कृषिमंत्र्यांनी बदली हवी असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच आयुक्तालयाकडे पाठवली आहे. त्यामुळे आता या बदल्यांना विरोध न करता मंत्री कार्यालयातून आलेल्या सूचनांप्रमाणे आयुक्तालयाकडून कार्यवाही केली जाणार आहे.

मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की बदल्यांबाबत कृषिमंत्र्यांनी आयुक्तांना थेट कोणतेही आदेश दिलेले नाहीत. बदल्या ही कृषी विभागाच्या कामकाजाचा नियमित भाग आहे. कृषिमंत्री व्यक्तिशः कोणतीही बदली सुचवत नसून बदल्यांसाठी नागरी सेवा मंडळाच्या शिफारस गृहीत धरली जाते. कृषिमंत्र्यांनी सेवा मंडळाची बैठक घेतली जावी व नियमानुसार कार्यवाही पूर्ण करावी, इतकेच आदेश दिले आहे. कृषी खात्याचे प्रमुख या नात्याने मंत्र्यांना काही मर्यादित अधिकार कायद्यानेच दिलेले आहेत.
दरम्यान, कृषी मंत्रालयातील अवर सचिव अ. नि. साखरकर यांनी कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांना पाठवलेल्या एका पत्रात तालुका कृषी अधिकारी संवर्गातील ७० अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी नागरी सेवा मंडळाची बैठक घ्यावी व बदल्यांच्या प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश कृषिमंत्र्यांच्या सांगण्यानुसार दिले जात असल्याचे एका जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याने सांगितले.

'गुणनियंत्रण'च्या खुर्चीसाठी स्पर्धा

निविष्ठा व गुणनियंत्रण कामकाजाशी संबंधित पदावर जाण्यासाठी काही तालुका कृषी अधिकाऱ्यांना जोरदार लॉबिंग केल्याची चर्चा आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील गुणनियंत्रणशी संबंधित मोहीम अधिकारीपदावर सुशांत बाजीराव लवटे यांनी, सातारा येथील मोहीम अधिकारीपदावर अशोक मोरे तर सोलापूरच्या मोहीम अधिकारीपदावर अजय वगरे यांनी हक्क सांगितला आहे. छत्रपती संभाजीनगरचे मोहीम अधिकारीपद पंकज अण्णासाहेब ताजणे यांना तर नाशिकचे मोहीम अधिकारीपद दीपक सोमवंशी यांना हवे आहे. जालना बीज प्रमाणीकरण कार्यालयाचे तंत्र अधिकारीपद भागवत खरात यांना तर अमरावती जेडीएमधील गुणनियंत्रणचे तंत्र अधिकारीपद नितीन लोखंडे यांना हवे आहे. पुणे गुणनियंत्रण विभागातील तंत्र अधिकारीपदी रवींद्र पाचपुते इच्छुक आहेत.
 

 

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.