'पन्नास खोके एकदम ओके' अशा घोषणा देत मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱया वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला.
सरकारने अपेक्षाभंग केल्यास उद्रेक तर होणारच असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले. जळगावच्या धरणागाव येथील पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी अॅड. शरद माळी यांनी याचिका केली होती. न्या. विभा पंकणवाडी व न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत अॅड. माळी यांच्याविरोधातील गुन्हा रद्द केला.
प्रत्येक आंदोलन शांततेचा भंग करत नाही
सामाजिक शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले होते, असा दावा पोलिसांनी केला होता. मात्र प्रत्यके आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, असे खडे बोल खंडपीठाने पोलिसांना सुनावले.
काय आहे प्रकरण…
गेल्या वर्षी मार्च महिन्यात आमदार सत्तार हे जळगाव जिह्याच्या दौऱयावर होते. त्यावेळी अॅड. माळी यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी (उद्वव बाळासाहेब ठाकरे) मंत्री सत्तार यांच्या वाहनाच्या ताफ्यावर कापूस व रिकामे खोके फेकले. '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा दिल्या, असा ठपका ठेवत शिवसैनिकांविरोधात (उद्वव बाळासाहेब ठाकरे) गुन्हा नोंदवण्यात आला होता. नाहक त्रास देण्यासाठी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. ती न्यायालयाने मान्य केली.
आरोपात तथ्य नाही
मंत्री सत्तार यांच्या ताफ्याला चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध केले, असा पोलिसांचा आरोप होता. मात्र आंदोलकांनी मंत्री सत्तार यांच्या वाहनांचा ताफा अडवला व मंत्री यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतले, असा तपशील नोंदवलेल्या गुह्यात नाही. त्यामुळे आंदोलकांवरील हा आरोप मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.