कोल्हापूर मनपातील रोजंदारीवरील 507 कर्मचारी कायम, सीएम शिंदेंकडून मध्यरात्री आदेशावर स्वाक्षरी
गेल्या 25 ते 30 वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेचे 507 कर्मचारी रोजंदारीवर काम करत होते. या सर्व रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम केलं आहे.
या आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री साडेतीन वाजता स्वाक्षरी केली. त्यामुळं रोजंदारी कर्मचारी कायम झाल्याने कर्मचाऱ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात गुलालाची उधळण कर, डॉल्बी आणि हलगीच्या ठेक्यावर या सर्व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारचे त्रिदेव आशयातील फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना खांद्यावर उचलून महापालिकेत नेत त्यांचे आभारही मानले. कोल्हापूर महापालिकेत रोजंदारीवर काम करणाऱ्या 507 कर्मचाऱ्यांना निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी कायम सेवेत घेतल्याची नियुक्तिपत्रे द्यावीत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना दिले होते.
प्रस्ताव काही पाठवू नका, सरकारने अध्यादेश काढला!
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील साडेचार हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना व्यासपीठावर बोलावून सर्वांसमक्ष महापालिकेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचे आदेश दिले. यावेळी मंजुलक्ष्मी यांनी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत प्रस्ताव सरकारकडे देण्यात येईल, असे सांगताच मुख्यमंत्री शिंदे यांनी आता प्रस्ताव काही पाठवू नका, सरकारने अध्यादेश काढला आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतल्याची नियुक्तिपत्रे देऊन टाका. हा मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्याचे सांगितले.मुख्यमंत्री शिंदे यांनी आदेश देताच दसरा चौकात सभेस आलेल्या महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.