मुलगीच जन्माला आली, टॅगने केला घोळ, जिल्हा रुग्णालयातील 4 डॉक्टरांसह 8 जण निलंबित
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात बाळ बदलल्याच्या प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. रविवारी रात्री जन्मलेलं बाळ मुलगा असल्याचं सांगितलं. पण जेव्हा डिस्चार्ज दिला तेव्हा मात्र हातात मुलगी सोपवली.
यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त करत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. आता या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून ४ डॉक्टर, ३ प्रशिक्षणार्थी डॉक्टर, एका नर्सला निलंबित केलं आहे. सिव्हिल सर्जन डॉक्टर शिंदे यांनी याबाबत माहिती दिली.
नांदूर नाका इथली महिली प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाली होती. तिची नैसर्गिक प्रसूती झाल्यानंतर मुलगा झाल्याचं सांगण्यात आलं. बाळाची प्रकृती बिघडल्यानं त्याला काचेच्या पेटीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतरही प्रकृती बिघडत असल्यानं कुटुंबियांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. कागदपत्रांचे सोपस्कर पूर्ण केल्यानंतर जेव्हा बाळ हातात आले तेव्हा मुलगी असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आलं.
कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर बाळ बदलल्याचे आरोप केले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तुम्हाला मुलगीच झाली होती असं सांगितलं. सिव्हिलच्या रजिस्टरसह सगळीकडे मुलगा झाल्याचीच नोंद केली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही चौकशी केली तेव्हा कागदोपत्री नोंद मुलगा असल्याचंच आढळून आलं. यासाठी चौकशी समितीही स्थापन केली.
चौकशी समितीने सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फूटेज आणि इतर बाबी तपासण्यात आल्या. जन्माला मुलगीच आली होती पण टॅगसह केसपेपरवर बाळाचा उल्लेख मुलगा असा केला गेला. बाळाला लावण्यात येणाऱ्या टॅगसह रजिस्टरमध्ये एफ ऐवजी एम असं लिहिल्यानं हा घोळ झाल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी म्हटलं. पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी बाळाची डीएनए चाचणी केली जाईल. पण पालकांना विश्वास वाटल्यानं त्यांनी बाळाचा स्वीकार केला असल्याचंही जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.