कोल्हापूर :- जीएसटी अधिकार्यास 25 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
कोल्हापूर : दंडाची कारवाई टाळण्यासाठी व्यावसायिकाकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) कार्यालयातील राज्य कर अधिकारी निवास श्रीपती पाटील (वय 45, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर, मूळ गाव कोलोली, ता.पन्हाळा) याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले. ऐन दिवाळीच्या तोंडावर जीएसटीमधील द्वितीय श्रेणीतील अधिकार्यावर झालेल्या कारवाईने प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
संशयित अधिकारी निवास पाटीलविरुद्ध रात्री उशिरा शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयितावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. असे लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांनी सांगितले. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तक्रारदार व्यावसायिकाची शहरात ऑईल आणि ग्रीस रिपॅकिंगची कंपनी आहे. जून 2024 मध्ये तक्रारदार यांच्या वडिलांना जीएसटी राज्य कर अधिकारी पाटील यांनी 2020 ते 2021 या काळात जीएसटी विभागाच्या नियमाप्रमाणे कागदपत्रे व रजिस्टर आहेत का, कसे याबाबत नोटीस बजावत विचारणा केली होती. नोटिसीच्या अनुषंगाने व्यावसायिकांनी कागदपत्रांची पूर्तताही केली होती.
तक्रारदार व त्यांच्या वडिलांनी जीएसटी कार्यालयात जाऊन अधिकारी पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी कंपनीचा बँक अकाऊंट नंबर, जीएसटी पोर्टलला अपडेट केलेला नाही. बॅलन्सशिट मधील क्रेडिटर्स डिटेल्स पूर्ण दिलेले नाहीत. या बाबीमुळे जीएसटीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला दीड ते दोन लाख रुपयांचा दंड व त्यावर व्याज मिळून अंदाजे दोन ते अडीच लाखाच्या दंडाची नोटीस काढणार असल्याचे त्यानी सुनावले. यावेळी तक्रारदारांनी संशयित अधिकार्याला कागदपत्रांची पूर्तता करतो, दंड नको, अशी विनवणी केली. पाटील यानी तक्रारदार पिता-पुत्राला सांगितले की, तुम्हाला दोन-अडीच लाखाच्या दंडाची नोटीस नको असल्यास मला 25 हजार रुपये द्यावे लागेल, असे सुनावले. ही रक्कम दिल्यास हा विषय बंद करून टाकतो, असेही त्यानी बजावले.अधिकार्यानेच 25 हजाराच्या लाचेची मागणी केल्याने व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांची भेट घेऊन अधिकारी निवास पाटील यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. पथकाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर त्यात तथ्य आढळले. आज दुपारी जीएसटी कार्यालयात 25 हजाराची लाच स्वीकारताना निवास पाटील यास पथकाने रंगेहाथ पकडले. अधिकार्याला जेरबंद केलेल्या पथकात वैष्णवी पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक आसमा मुल्ला, अजय चव्हाण, विकास माने, सुनील घोसाळकर, सुधीर पाटील यांचा समावेश होता. संशयित पाटील याच्या फ्लॅट व कोलोली येथील घराची रात्री उशिरापर्यंत तपासणी करण्यात येत होती, असेही वैष्णवी पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.