"लाडक्या बहिणीचे 1500 मला मिळाले असते तर..." आशा भोसले असं काही बोलून गेल्या की सर्वच झाले स्तब्ध
मुंबई: महायुती सरकारनं सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेला राज्यभरातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळतोय. जुलैपासून योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारनं जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 असे एकूण 3000 रुपये जमा केले. आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. म्हणजेच एकूण 4500 रुपये मिळाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या महिन्यातील रकमेचं वितरण 29 सप्टेंबर रोजी केलं जाईल, असं राज्य सरकारनं सांगितलं होतं. त्यानुसार, लाभार्थी महिलांच्या खात्यात पैशांच्या वितरणास सुरुवात झाली आहे. नुकतंच केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. यानिमित्त मराठी भाषा विभागाच्या वतीने खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या प्रसंगी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
आशा भोसले यांनी मानले सरकारचे आभार
मराठी भाषा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी सन्मान सोहळ्याला ज्येष्ठ गायिका यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार तर मानलेच, पण त्याचबरोबर त्यांनी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरू केल्याबद्दल आणि योजनेला मिळणाऱ्या यशाबाबत महाराष्ट्र सरकारचे कौतुकही केले आहे. या प्रसंगी त्यांच्या भावना व्यक्त करत त्या म्हणाल्या, "लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये तुम्ही दिले आहेत, त्यांची व्यथा आणि त्यांची खूशी माझ्याशिवाय आणखी कोणाला कळणार नाही. हे काम जर सत्तेचाळीस साली कोणी केलं असतं, 1500 रुपये मला मिळाले असते, तर मी दोनवेळ जेवू शकले असते. सकाळचं जेवण संध्याकाळसाठी जपून ठेवलं नसतं. मी अन्न साठवून ठेवायचे. मी दुपारी जेवू शकत नव्हते. जेव्हा माझे पती घरी यायचे, तेव्हा आम्ही एकत्र जेवायचो. तेवढंच जेवण माझ्याजवळ असायचं."त्या पुढे म्हणाल्या, "ज्या महिलांकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी हे 1500 रुपये खूप महत्त्वचे आहेत. अशा महिलांसाठी तुम्ही खूप चांगले काम केले आहे. मी त्यांच्या वतीने तुमचे आभार मानते, कारण या परिस्थितीतून मी गेले आहे." दरम्यान, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जुलै 2024 पासून प्रति महिना 1500 रुपये राज्य सरकारकडून जमा केले जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्रतेच्या काही अटी ठरवून दिलेल्या आहेत. त्यानुसार, महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे. वय किमान 18 आणि कमाल 60 वर्षे असायला हवं. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं. घरात कोणाला सरकारी नोकरी नसावी. बँक खातं आधार कार्डशी लिंक असावं. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले असून कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात धाडण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.