धक्कादायक! 11 वर्षीय मुलावर 9 जणांकडून सामूहिक अत्याचार; आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
अहमदनगर : राज्यात बाल लैंगिक अत्याचार आणि अल्पवयीन व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. बदलापूरच्या शाळेतील बाल लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
या लाटेनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना उघड झाल्या असून पोलिसांनी देखील तातडीने कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीचा काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटर करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली होती. आता, पुन्हा एकदा 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. येथील 9 जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. 11 वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गांभीर्यता समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.