ऐन निवडणुकीच्या तोंडावर 100 कोटी वसुली प्रकरणात मोठी अपडेट; आरोपी सचिन वाझेला जामीन मंजूर, पण...
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शंभर कोटी रुपयांचं खंडणी वसुली प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. राज्याचे पोलिस महासंचालक परमबीर सिंंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
यावेळी सचिन वाझेविरोधात 100 कोटी वसुली प्रकरणात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आता या खंडणी वसुली प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने २३ ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता. आता उच्च न्यायालयाने वाझेला दिलासा देतानाच त्याला जामीन मंजूर केला आहे.
मुंबई हायकोर्टाकडून आरोपी सचिन वाझेला दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीनाच्या अटी-शर्थी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले होते.अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेनं उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली होती. तसेच अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारीही वाझे याने दर्शवली होती; मात्र, ईडीने याला विरोध दर्शविला होता.आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच वाझेला जामीन मंजूर झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.आरोपी सचिन वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ॲड. रोनक नाईक यांच्यामार्फत अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनिल देशमुखानंतर न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात येणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. अखेर जवळपास अडीच वर्षांच्या कालावधीनंतर वाझेला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मात्र, मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार आहे.वाझे याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी ज्येष्ठ वकील आबाद पोंडा व ॲड. रोनक नाईक यांच्यामार्फत अर्ज दाखल केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.