पती एमडी, दवाखाना बांधायला 1 कोटी रुपये आणण्यासाठी छळ, MBBS पत्नीने स्वत:ला संपवलं
परभणी : पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून एमबीबीएस महिला डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडलीय. पालम शहरात लोहा रोडवर ३० वर्षीय महिला डॉक्टरने जीवन संपवलं. महिलेचा पतीसुद्धा डॉक्टर असून त्याने दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून १ कोटी रुपये आणण्यासाठी तिचा छळ केला असा आरोप आहे.
या प्रकरणी पतीसह त्याच्या कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रियांका निलेश व्हरकटे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिला डॉक्टरचं नाव आहे. तिचं लग्न २०२२ मध्ये बीडमधील निलेश व्हरकटे याच्याशी झालं होतं. लग्नानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळींकडून १ कोटी रुपये माहेरहून आणण्यासाठी छळ सुरू केला. याप्रकरणी भरोसा सेलकडे तक्रारही दिली होती. पण तिथे तडजोड न झाल्यानं शेवटी पालम पोलिसात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
प्रियंका माहेरी राहत असतानाही तिला सासरच्या मंडळींकडूम फोन करून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळलेल्या प्रियांकाने पालम इथं राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी प्रियंकाचा पती डॉक्टर निलेश व्हरकटे, राम व्हरकटे, सुनिता व्हरकटे, तेजस व्हरकटे, तनया व्हरकटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रियांका व्हरकटे या प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. पण तीन महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. गंगाखेड तालुक्यातल्या कोदरी इथं त्या काम करत होत्या. प्रियांका यांचे पती डॉक्टर निलेश व्हरकटे हे एमडी असल्याची माहिती परभणीच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलीय.
१५ दिवसात दुसरी घटना
गेल्या १५ दिवसात ही दुसरी घटना घडली आहे. १ ऑक्टोबरला महिला डॉक्टरने पाच महिन्यांच्या बाळासह गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती. बाळाला दूध पाजता येत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.