वड्यात मीठ जास्त विचारलं, 'जोशी वडेवाले'मध्ये गर्भवती महिलेला आणि पतीला मारहाण, VIDEO व्हायरल
माणगाव: मुंबई-पुणे महामार्गावरून जात असताना नेहमी जोशी वडेवाले हॉटेल हे नेहमी पाहण्यास मिळते. अनेक प्रवाशी वडापाव खाण्यासाठी इथं थांबत असतात. पण रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथं जोशी वडेवाले फ्रेंचाईजवर धक्कादायक घटना समोर आली आहे.
वड्यात मीठ जास्त विचारलं म्हणून गर्भवती महिलेला आणि तिच्या पतीला मारहाण कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरातील रेल्वे स्टेशन इथं असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये ग्राहकाने वड्यात मीठ जास्त असल्याने विचारले असता ग्राहकाला मारहाण केल्याची घटना घडली. 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी काव्या हेलगावकर आणि अंकित हेलगावकट हे जोशी वडेवाले हॉटेल माणगाव इथं नाष्टा करण्यासाठी थांबले होते. त्यांनी मागवलेला वड्यामध्ये मीठ जास्त असल्याचं लक्षात आलं.
अंकित यांनी हॉटेलचे कर्मचारी आरोपी शुभम जेसवाल यांना याबद्दल विचारणा केली. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. या गोष्टीचा शुभम जेसवाल यांना राग आला. त्यानंतर आरोपी आणि त्याचे सोबत काम करणाऱ्या अनोळखी 5 जणांनी अंकित हेलगावकट आणि त्यांच्या पत्नीला हाताबुक्याने, फायबर खुर्चीने मारहाण केली. अंकित यांनी हा सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.या मारहाणीमध्ये फिर्यादी आणि साक्षीदार क्रमांक यांचे गळयातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची बाली तुटून पडली. तसंच आरोपी शुभम जेसवाल, ग्यानचंद जेसवाल, शुभम जेसवाल याची आई आणि बहीण यांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.घडलेल्या प्रकारानंतर अंकित हेलगावकट यांनी माणगाव पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. बेलदार करीत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.