व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतरही लगेचच संपूर्णपणे अवयव बंद पडत नाहीत. त्यामुळे काही वेळा अतर्क्य वाटतील अशा घटना घडतात. काही जण त्याला चमत्कार म्हणतात, तर काही देवाचा आशीर्वाद. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये अशाच स्वरूपाची एक घटना घडली. मृत्यू झाल्यानंतर चितेवर ठेवल्यावर मृतदेहाला घाम आला. यामुळे नातेवाईकांनी रुग्णासह पुन्हा रुग्णालयात धाव घेतली. जाणून घ्या नेमकं काय घडलं.
आपल्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालेलं कोणालाच सहन होत नाही. डॉक्टरांकडून मृत्यू झाल्याचं ऐकणं ही त्या नातेवाईकांसाठी खूप दुःखाची गोष्ट असते. आपली जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाऊ नये, ती बरी व्हावी, आपल्यासमोर उभी राहावी असं प्रत्येकाला वाटतं, मात्र वास्तव नाकारता येत नाही. काही घटनांमध्ये मात्र धक्कादायक गोष्टी घडतात. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिला अंत्यसंस्कारांसाठी चितेवर ठेवलं असता तिच्या चेहऱ्यावर घाम आल्याचं नातेवाईकांना दिसलं. यामुळे त्यांना काही काळ आनंद झाला, पण तो क्षणिकच होता.
शिवपुरी शहरातील शांती नगर भागात राहणाऱ्या अनिता श्रीवास्तव यांना खूप ताप आला होता. त्यांना टायफॉइडचं निदान झालं. प्रकृती खूप जास्त बिघडल्यामुळे 29 ऑगस्ट रोजी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना सरकारी रुग्णालयात नेण्यासाठी सांगण्यात आलं. महिलेच्या नातेवाईकांनी त्यांना सरकारी रुग्णालयात नेलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.
त्या दिवशी रात्र झाल्याने महिलेवर दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑगस्ट रोजी अंत्यसंस्कार करायचं कुटुंबियांनी ठरवलं. दुसऱ्या दिवशी महिलेचा मृतदेह घेऊन नातेवाईक स्मशानात गेले व तिथे अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली. मृत महिलेला चितेवर ठेवण्यात आलं, मात्र पुढे जे घडलं ते पाहून नातेवाईकांना धक्का बसला.
मृत महिलेच्या कपाळावर घाम येत होता व शरीराचीही थोडी हालचाल होत होती. यामुळे नातेवाईकांनी चितेवरून उचलून महिलेला खाली ठेवलं. तिथे पहिले सीपीआर देऊन मग रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेलं. नातेवाईकांच्या आग्रहावरून डॉक्टरांनी महिलेची पुन्हा तपासणी केली. इसीजी व इतर तपासण्या केल्या. मात्र पुन्हा डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर काही क्षणांसाठी असा आभास निर्माण होऊ शकतो. मात्र ती महिला आधीही मृत होती व नंतरही ती मृतच होती, असं तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.