पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला, पाच ते सहा मारेकऱ्यांच्या हल्ल्यात पत्नीही जखमी
रविवारी सकाळी ते पुण्याकडे जाण्याचा तयारीत असताना, सकाळी साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच अनोळखी मारेकऱ्यांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला.
खानापूर : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपतीचा कारवार तालुक्यातील हाणकोण येथे रविवारी (ता.22) पहाटे चार ते पाच मारेकऱ्यांनी खून केला. विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) असे त्यांचे नाव असून, ते मूळ हाणकोण येथील रहिवासी आहेत. या हल्ल्यात त्यांची पत्नी जखमी झाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक नाईक हे पुण्यात मोठे उद्योजक असून, त्यांचा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा व्यापार आहे. ते आपल्या कारवार तालुक्यातील मूळ गावी हाणकोण येथे सातेरी देवीच्या उत्सवानिमित्त आले होते. हा उत्सव १० सप्टेंबर ते १६ सप्टेंबरपर्यंत असतो, मात्र त्यांच्या आईचे श्राद्ध असल्यामुळे ते येथेच राहिले होते.
रविवारी सकाळी ते पुण्याकडे जाण्याचा तयारीत असताना, सकाळी साडेपाचच्या दरम्यान चार ते पाच अनोळखी मारेकऱ्यांनी मोटारीतून येऊन त्यांच्यावर चाकू, लोखंडी रॉड व तलवारीने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याही जखमी झाल्या.या घटनेची नोंद सदाशिवगड पोलिस स्थानकात झाली आहे. कारवारचे पोलिस अधीक्षक के. नारायण यांनी घटनास्थळी देऊन आढावा घेतला आहे. त्यांनी यावेळी उपअधीक्षक गिरीश यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी पथक स्थापन केले असून, त्याद्वारे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.