मडगाव : गुरांच्या चरबीतून केलेल्या तुपाची हॉटेल्सना विक्री:, आलिशान बंगल्यात गुरांचा कत्तल खाना
मडगाव : चार मजली आलिशान बंगला, महागड्या गाड्या, बाजारात दुकाने, स्वरक्षणासाठी 'बाऊन्सर' अशा थाटात जगणार्या खारेबांदच्या 'त्या' कसायाने कोणालाही सुगावा लागणार नाही, अशा पद्धतीने घराच्या तळमजल्याला कत्तलखाना बनवला आहे.
त्याने या कत्तलखान्यात आतापर्यंत चोरीच्या हजारो गुरांची अत्यंत कत्तल करून राज्यभर मासांची विक्री केली आहे. गुरांची चरबी शिजवून तयार केलेला पदार्थ तूप म्हणून राज्यातील हॉटल्सना विकल्याचाही संतापजनक प्रकार समोर आला आहे.
रविवारी 22 रोजी रात्री बजरंग दल आणि गोरक्षकांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. उत्तर गोव्यातून दोन बैल कत्तलीसाठी खारेबांद येथील त्या कासायाच्या घरी आणण्यात आले होते. बजरंग दल आणि गोरक्षकांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सदर कत्तलखान्याची पहाणी केली असता, गुरांची कत्तल करण्यासाठी वापरण्यात येणारी सर्व हत्यारे, मोठ्या आकाराचे सुरे, खरवती सारखे लहान आकाराचे हत्यार, गुरांना बांधून ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या दोर्या, गुरांची चरबी आणि चरबी पासून बनवल्या गेलेल्या तुपाचे 42 डबे अशा वस्तू आढळून आल्या.मिळालेल्या माहितीनुसार, गुरांची चोरी करणार्या अनेक टोळ्या त्याच्या संपर्कात आहेत. चरण्यासाठी सोडलेल्या गुरांना त्या टोळ्या पकडून 30 ते 40 हजार रुपयांच्या बदल्यात त्या कसायाला विकत आहेत. गेली अनेक वर्षे हा प्रकार सुरू आहे. त्या कसायाची मडगावच्या 'एसजीपीडीए'च्या संकुलासह रुमडामळ भागात बीफची दोन दुकाने असून यातही गैरव्यवहार सुरू असल्याचे चौकशीत समोर आले आहे. कोणाला थांगपत्ता लागू नये, यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास गुरे आणली जातात. गुरांची वाहतूक करणारी रिक्षा थेट आतपर्यंत नेण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. गुरांच्या कत्तलीचा प्रकार समोर येऊ नये, यासाठी त्या चारमजली बंगल्या भोवताली संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. तीन ते चार दिवस गुरांना उपाशी ठेवून नंतर त्यांची कत्तल केली जात आहे. उत्तर गोव्यातूनसुद्धा त्यांना गुरांचा पुरवठा केला जात आहे.
गुरांची कत्तल केल्यानंतर राहिलेली चरबी शिजवून त्यापासून बनवलेले तूप तो राज्यातील अनेक हॉटल्सना पुरवत असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार भगवान रेडकर म्हणाले, दक्षिण गोव्यात ज्या-ज्या ठिकाणी बेकायदा सुरू असणार्या कत्तलखान्यावर धाड घालण्यात आली, त्या-त्याठिकाणी चरबीपासून तूप बनवले जात असल्याचा प्रकारही समोर आले आहेत. आरोग्यासाठी हे तूप घातक आहे. काही हॉटेल्समध्ये या तुपाचा पुरवठा झाला आहे. एका हॉटेलवर 'एफडीए'नेही कारवाई केली आहे. त्यामुळे या सार्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी रेडकर यांनी केली आहे.
तेल सदृश पदार्थांच्या वापराचा तपास सुरू : देसाई
गुरांच्या चरबीपासून बनवला जाणारा तेल सदृश पदार्थांचा वापर नेमका कशासाठी केला जातो, याचा तपास सुरू आहे. तेल म्हणून त्याचा वापर अन्नपदार्थात केला जातो की साबणासारख्या अन्य कोणत्या उत्पादन प्रक्रियेत त्याचा वापर होतो, हे तपासानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.