Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित पवार आल्याचा नव्हे, ठाकरे गेल्याचा भाजपला मोठा फटका! रावसाहेब दानवे

अजित पवार आल्याचा नव्हे, ठाकरे गेल्याचा भाजपला मोठा फटका! रावसाहेब दानवे
 
 

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला, असे विधान माजी केंद्रीय मंत्री, भाजपचे निवडणूक संचालन समितीचे प्रदेश संयोजक रावसाहेब दानवे यांनी केले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार, असे मनोज जरांगे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्यावे. या तिघांनी त्यांच्या जाहीरनाम्यातही तसा उल्लेख करावा, असे आव्हानही दानवे यांनी दिले. 

दानवे यांनी रविवारी (ता. १) 'सकाळ'च्या येथील कार्यालयाला भेट दिली, त्यावेळी संवाद साधताना त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश, विधानसभेची वाटचाल, मराठा, ओबीसी आरक्षण आदी विविध मुद्द्यांवर दिलखुलास चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांना सोबत घेतल्याचा फटका बसला का, या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा सोबत घेणार का, यावर थेट उत्तर न देता त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप करीत जोरदार टीका केली.

पवारांनी आरक्षण का दिले नाही?

मराठा आरक्षण हा मागील तब्बल ४० वर्षांपासूनचा मुद्दा आहे, तो काही आजचा नाही. या ४० वर्षांच्या काळात शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री झाले, तरीही हा प्रश्न का सोडविण्यात आला नाही. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण का दिले नाही, असे प्रश्न दानवेंनी उपस्थित केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी आमची, भाजपची भूमिका आहे. परंतु, हे करत असताना अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही. मात्र, या विषयावर विरोधक आक्रस्ताळी भूमिका घेत असल्याचा आरोप करताना दानवे यांनी विरोधकांना थेट आव्हानच दिले. ते म्हणाले, 'मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार, असे मनोज जरांगे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्यावे. या तिघांनी त्यांच्या जाहीरनाम्यातही तसा उल्लेख करावा'.

शेवटच्या टप्प्यात फटका बसला

लोकसभा निवडणुकीत प्रारंभी आमच्याच बाजूने वातावरण होते. नंतर ते बदलत गेले. शेवटच्या टप्प्यात तर सारेच वातावरण बदलून गेले. या टप्प्यात आम्हाला फटका बसला. अगदी माझाही पराभव झाला. विशेष म्हणजे ज्या उमेदवाराला मी पाहिले नव्हते, त्यानेही दीड लाख मते घेतली, असे दानवे म्हणाले.

बदला घेणार नाही

यांच्यामुळे पडलो, त्यांच्यामुळे पडलो असे मी म्हणणार नाही आणि त्याचा बदलाही घेणार नाही. माझ्या भोकरदनमध्येच मी मागे राहिलो, मग काय माझ्या मुलाचा बदला घ्यायचा का? असा सवालही त्यांनी केला.

काठावरचे मतदान मिळाले नाही

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाची मते भाजपला मिळाली नाहीत. ओबीसींची मतेही फुटली याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'संपूर्ण समाजाने मग तो मराठा असो किंवा ओबीसी, भाजपला मते दिली नाहीत असे म्हणता येणार नाही. परंतु, काठावरचे मतदान मात्र मिळाले नाही, हे निश्चित. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभा निवडणुकीवेळी होणार नाही. विधानसभा निवडणुकीत विकासकामांवर आम्हाला नक्कीच यश मिळेल'.

संविधान बदलण्याचा खोटा प्रचार

लोकसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांनी भाजप ४०० जागा जिंकल्यानंतर संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार केला. यामुळे लोक संभ्रमात होते. प्रत्यक्षात काँग्रेसनेच ७२ वेळा संविधानात बदल केले आहेत. त्यात सर्वात मोठे उदाहरण आणीबाणीचे आहे. त्यावळी संविधान बाजूला ठेवून कसे निर्णय घेण्यात आले, हे सर्वांनी पाहिले आहे, असे त्यांनी सांगितले.

'कन्व्हिन्स' किंवा 'कन्फ्युज' करा

दानवे म्हणाले, निवडणुकीत एक तर लोकांना 'कन्व्हिन्स' केल्यानंतर किंवा 'कन्फ्युज' केल्यानंतर मते मिळतात. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी लोकांना संविधान बदलणार म्हणून 'कन्फ्युज' केले आणि आम्ही 'कन्व्हिन्स' करू शकलो नाही, याचा फटका आम्हाला बसला.

म्हणे आता गृहमंत्र्यांनी माफी मागावी

मालवण येथील पुतळा दुर्घटनेबाबत विरोधकांना लक्ष्य करताना दानवे म्हणाले, 'मालवण येथील घटनेत दोषींवर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु, या घटनेबाबत सध्या राजकारण केले जात आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. आता विरोधक म्हणतात, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफी मागायला हवी. पंतप्रधानांनी मागितल्यावर फडणवीसही मागतील, त्यात काय? या घटनेबाबत राजकरण होऊ नये'.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.