देशिंग : तालुक्यातील देशिंग येथील एका शाळेतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. भरत विश्वनाथ कांबळे (वय 48, रा. सुभाषनगर, ता. मिरज) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी कवठेमहांकाळ पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत हा शिकवताना मुलींबरोबर अश्लील वर्तन करीत होता. संबंधित विद्यार्थिनींनी हा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालक या शिक्षकावर लक्ष ठेवून होते. भरत सोमवारी वर्गात शिकवत असताना मुलींबरोबर अश्लील प्रकार करीत असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. यावेळी पालकांनी कवठेमहांकाळ पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी भरतवर विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील तपास करीत आहेत.
प्रशासनाकडून तातडीने हालचाली
प्राप्त अहवालानुसार शिक्षक भरत कांबळेला सेवेतून निलंबित केले आहे. तसा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर यांनी काढला आहे. निलंबनाच्या काळात त्याला मुख्यालय शिराळा पंचायत समिती शिक्षण विभाग येथे पाठवले आहे.
ग्रामस्थांतून संताप व्यक्त
शिक्षकाने केलेल्या प्रकाराबद्दल मंगळवारी (दि. 10) देशिंग गाव व सर्व शाळा, हायस्कूल्स बंद ठेवण्याचा निर्णय संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य व शिक्षण समितीतर्फे सकाळी 10 वाजता हनुमान मंदिर ते शाळा असा मोर्चा काढण्यात येणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.