Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवले; अपघातस्थळावरून संकेत पळून गेला

बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवले; अपघातस्थळावरून संकेत पळून गेला
 

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागकुरात रविवारी मध्यरात्री कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधडय़ा उडाल्या. पैसा आणि सत्तेच्या माजाने नागपूरच्या रस्त्यावर धिंगाणा घातला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या भरधाव ऑडी कारने एकामागोमाग पाच वाहनांना उडवले.

या भीषण अपघातात दोन तरुण जखमी झाले असून वाहनांचा चेंदामेंदा झाला. या घटनेने भेदरलेला संकेत आणि त्याचा एक मित्र पळून गेला तर अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण दाबण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू असून त्यासाठी ऑडीची नंबर प्लेट हटवण्यात आली तसेच पोलिसांनी ड्रायव्हरचीही अदलाबदली केल्याची चर्चा आहे.


संकेत बावनकुळे आणि त्याचे तीन मित्र या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या धरमपेठेतील लाहोरी येथे गेले होते. तिथे त्यांनी जेवण केले. मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास चौघेही एमएच 40-सीवाय-4040 या क्रमांकाच्या ऑडी कारने रामदास पेठकडे आले. यादरम्यान ऑडीने जितेंद्र सोनकांबळे यांच्या एमएच-31-ईके-3939 या क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर एका मोपेडला ठोकले. त्यावरील दोन तरुण या धडकेत जखमी झाले. ऑडीचा वेग इतका होता की तिने मानकापूरच्या दिशेने जाणाऱया अन्य तीन वाहनांनाही धडक दिली. त्यात एमएच-49-झेड-8637 या क्रमांकाच्या कारचा समावेश आहे. त्यानंतर एका पोलो कारलाही जोरदार धडक दिली. पोलो कारच्या चालकाने ऑडीचा पाठलाग करून ती माणकापूर कुलावर थांबवण्यास भाग पाडले.

माणकापूर कुलावर ऑडी थांबताच संकेत आणि त्याचा एक मित्र कारमधून बाहेर उडी टापून पळून गेले. कारमधील अर्जुन हावरे आणि रोहित चित्तमवार या दोघांना पकडून तहसील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. नंतर त्यांना सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अर्जुन हा अभियंता असून सरकारी पंत्राटदार आहे तर रोनित याचा ट्रान्सफॉर्मरचा व्यवसाय आहे. जितेंद्र सोनकांबळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद केला.

सदरहू ऑडी कारमधील चार लोक धरमपेठमधील एका बीअर बारमधून बाहेर पडले होते. त्यानंतर हा सर्व प्रकार घडला असे वृत्त पीटीआय वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्यातून दिले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन जणांना नंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. ऑडी कार कुठून निघाली आणि वाहनांना उडवत कशी धरमपेठपासून माणकापूरपर्यंत कशी आली त्याचे सीसीटीव्ही मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत
.
घटना घडली तेव्हा ऑडीमध्ये चार तरुण होते, असे तक्रारदार सोनकांबळे यांचे म्हणणे आहे. चौघेही मद्यधुंद अवस्थेत होते असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. परंतु वरून दबाव आल्याने पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ऑडीची नंबर प्लेट काढून टाकण्यात आली आणि ड्रायव्हरचीही अदलाबदली करण्यात आली असे समोर आले आहे. संकेत हा गाडी चालवत होता असे सोनकांबळे यांनी सांगूनही अर्जुन गाडी चालवत होता, असा दावा पोलीस करीत आहेत.

ती ऑडी माझ्या मुलाचीच

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ती ऑडी आपला मुलगा संकेत याचीच असल्याची कबुली दिली. माझ्या मुलाच्या नावे ती गाडी आहे. या अपघाताची पोलिसांनी निष्पक्षपणे पूर्ण चौकशी करावी, कुणालाही वेगळा न्याय लावू नये, जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे बावनकुळे म्हणाले. मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही, असा दावा करतानाच, न्याय सर्वांना सारखा असायला हवा मग कुणी राजकारणाशी सबंधित असो किंवा आणखी कुणी असो, असे बावनकुळे म्हणाले.

बावनकुळेंसाठी कायदा वेगळा का?

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेसंदर्भात ट्विट करून मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. 'रविवारी रात्री नागपूरच्या रामदास पेठमध्ये महागडय़ा इलेक्ट्रॉनिक ऑडीने अनेक गाडय़ा उडवल्या. मद्यधुंद अवस्थेत असलेला चालक संकेत बावनकुळे असल्याचे समोर येत आहे. मात्र आश्चर्य असे की आरटीओने गाडीचा नंबर न नोंदवता ती गाडी सोडून दिली. चंद्रशेखर बावनकुळेंसाठी कायदा वेगळा का?' असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.