Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा; बेताल संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा

राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा; बेताल संजय गायकवाडच्या मुसक्या आवळा
 

मुंबई:  आपल्या बेताल वक्तव्यांसाठी आणि बेलगाम वागण्यासाठी कुप्रसिद्ध बुलढाण्याचा आमदार संजय गायकवाड याने पुन्हा एकदा आपली लायकी आणि पातळी दाखवून देत लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची जीभ कापणा-यास ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले.

या गुंड प्रवृत्तीच्या आमदाराच्या वक्तव्याची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या मुसक्या आवळाव्यात अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते या गुंडांचा बंदोबस्त करतील असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, जननायक राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे हताश आणि निराश झालेले सत्ताधारी. राहुलजींच्या वक्तव्याची मोडतोड करून विपर्यास करून त्यांच्या बदनामीची मोहिम चालवत आहेत.

राहुल गांधी कधीही आरक्षण बंद करू असे म्हटले नाहीत. उलट आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवून ज्या समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत ते सोडवू असे म्हटले आहेत. पण भारतीय जनता पक्ष आणि त्यांची पिलावळ साततत्याने अफवा पसरवून फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे गुंड प्रवृत्तीचे लोक तर त्यापुढे जाऊन जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. सरकार या गुंडावर काहीच कारवाई करत नाही, त्यामुळे देशात कायद्याचे राज्य आहे की भाजपाच्या गुंडांचे असा प्रश्न जनतेला पडला आहे?

संजय गायकवाड सारख्या अडाणी लोकांना राहुल गांधी अमेरिकेत काय बोलले ते माहित तरी आहे का? राहुल गांधी मोदी, शाह यांना घाबरत नाहीत. संजय गायकवाड सारख्या गावगुंडांच्या धमक्यांना ते थोडेच घाबरणार आहेत. आमच्यासारखे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी काँग्रेस कार्यकर्ते ढाल बनून त्यांचे संरक्षण करायला सज्ज आहेत. त्यांच्या केसाला धक्का लावायचा प्रयत्न सोडा विचारही करू नका असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

"महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्यांची वृत्ती आणि राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर करणाऱ्याची वृत्ती एकच आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मारण्याची धमकी दिल्याने त्यांचा आवाज बंद होणार नाही. राहुल गांधींनी आजवर कायम संविधान रक्षणाची भूमिका घेतली आहे. ते जे बोललेच नाही ते त्यांच्या तोंडी घालून त्यांना बदनाम करण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, ते कधीही यशस्वी होणार नाही.

संजय गायकवाड जे बोलले ते अत्यंत निषेधार्य आहे. यात आपल्याला जी प्रवृत्ती दिसते, ती पुरोगामी विचारांचा जनसामान्यांचा जो विचार मांडला जातोय त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही प्रवृत्तीची आहे. आम्हाला त्यात नथुराम गोडसे दिसत आहे. संजय गायकवाड फार सामान्य आहे, आमदार आहे. त्याची प्रवृत्ती ही देशाला विघातक आहे.

संजय गायकवाड औकाती बाहेर बोलतो – विजय वडेट्टीवार

"संजय गायकवाड वर गुन्ह्याची नोंद करा, कारवाई करा. संजय गायकवाड औकाती बाहेर बोलत आहे. राहुल गांधी यांचे नाव घेण्याची तुझी औकात नाही. तू कुठे आणि तुझा पक्ष कुठे आहे? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुमचा माज आणि मस्ती उतरेल", असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.