Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला

"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपती दर्शनाला गेल्याने राजकीय वादंग निर्माण झाले. विरोधकांनी यावरून सवाल उपस्थित केले. पण, मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आभार मानत सरन्यायाधीश चंद्रचूड यांना खोचक टोला लगावला.  उद्धव ठाकरे यांची वैजापूरमध्ये सभा पार पडली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या खटल्यांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी-सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भेटीवर भाष्य केले.

"कोर्टाचा निकाल लागेल अशी अपेक्षा ठेवणे..." 

"मी आज मुद्दामहून सांगायला आलोय. तुम्ही मशाल पेटवणार आहात की नाही? गेल्यावेळी आपल्याला मशालीचा प्रचार करायला वेळ नाही मिळाला. पण, आजपासून तुमच्याकडून वैजापूरमध्ये प्रत्येक घरात मशाल पोहोचलीच पाहिजे. हे वचन मला तुमच्याकडून हवे आहे", असे ठाकरे म्हणाले.  उद्धव ठाकरे म्हणाले, "कारण धनुष्यबाण आणि मशाल... आपल्यासमोर पुन्हा गद्दार धनुष्यबाण घेऊन येईल. त्याच्याआधी कोर्टाचा निकाल लागेल, अशी अपेक्षा करणे आता किती योग्य आहे की, अयोग्य मला कल्पना नाही.


अहो काय थट्टा चाललीये? ठाकरेंनी केला सवाल

पंतप्रधान सरन्यायाधीश भेटीचा उल्लेख करत ठाकरेंनी चंद्रचूड यांना चिमटा काढला. ते म्हणाले, "कारण काल-परवा स्वतः पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन आलेत. अख्ख्या देशात त्याची निंदा झाली. अगदी संजय राऊत तुम्ही सुद्धा निंदा केली. पण, मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो." 

"तुम्ही म्हणाल का? कारण एवढ्यासाठी की, मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख नाही दिली. आमच्याकडे मोदी येताहेत. गणपती बाप्पा तू जरा नंतर ये. अहो काय चाललीये थट्टा?", असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

"दोन वर्षे होऊन गेली. आम्ही तुमच्याकडे जी दाद मागत आहोत, ती शिवसेनेची आहे. पण, शिवसेनेच्या माध्यमातून लोकशाही जिवंत राहणार आहे की नाही, हे आम्ही तुमच्याकडे मागतोय", असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 
मला तुमच्याकडून न्याय पाहिजे -ठाकरे

"न्याय देवतेवर आमचा विश्वास जरूर आहे. पण, जर न्याय वेळेमध्ये दिला गेला नाही, तर त्याहीपेक्षा मोठे कोर्ट माझ्यासमोर बसलेले आहे. जनतेचे न्यायालय, हे सर्वोच्च न्यायालय या देशातील आहे आणि त्या न्यायालयाच्या दरबारात मी आजपासून आलेलो आहे. मला न्याय तुमच्याकडून पाहिजे", असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.