Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वैद्यकीय महाविद्यालयांच्या नफेखोरीला चाप

वैद्यकीय महाविद्यालयांच्या नफेखोरीला चाप
 

पुणे :- वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशावेळी अनामत रक्कम (कॉशन मनी) म्हणून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांना आता मोठा चाप बसला आहे. शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) या महाविद्यालयांना ५० हजारांपेक्षा अधिक शुल्क आकारता येणार नसल्‍याचे स्‍पष्ट केले आहे.

एफआरएने वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अनामत रक्कम ठरविली असून, ती रक्कम शिक्षण संपल्यानंतरही ९० दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना परत करणे अनिवार्य आहे. यासंबंधीचे परिपत्रक “एफआरए’चे सदस्य सचिव एस. राममूर्ती यांनी प्रसिद्ध केले आहे. राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाचे काही महाविद्यालये ८ ते १० लाख रूपये शैक्षणिक शुल्कासोबतच अनामत रकमेसोबतच होस्टेल, ग्रंथालय, प्रयोगशाळा, मेस आदींसाठी एकूण पाच लाखांपेक्षा अधिक रक्कम आकारतात. ही सुरक्षा ठेव साधारण साडेचार वर्षांसाठी ठेवण्यात येते.
 
 
या रक्कमेवरील व्याजाची रक्कम महाविद्यालय प्रशासन आपल्याकडे ठेवत असून, त्याद्वारे नफा कमवत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मात्र, त्याचा उल्लेख कुठेही महाविद्यालय प्रशासनाकडून आपल्या जमा-खर्चाच्या यादीत नमूद करण्यात येत नाही. त्याचप्रमाणे ही रक्कमही महाविद्यालय विद्यार्थ्य़ांना लवकर परत करीत नाही. याबाबत तक्रारी आल्यानंतर “एफआरए’ने हा निर्णय घेतला आहे.

“एफआरए’ने एमबीबीएस, एमडी, एमएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीएस्सी नर्सिंग अशा १६ वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अनामत रक्कम किंवा इतर शुल्क म्हणून रक्कम ठरवून दिली आहे. या नियमाची अंमलबजावणी न करणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येणार असल्‍याचा इशारा एफआरएने दिला आहे.

अभ्यासक्रम – शुल्क
 
एमबीबीएस, एमडी, एमएस, डीएम – ५०,०००
बीडीएस (यूजी, पीजी) – ४०,०००
बीएएमएस, बीएचएमएस (यूजी, पीजी) – २५,०००
बीयूएमएस (यूजी, पीजी) – १०,०००
बीपीटीएच, एमपीटीएच – २०,०००
बीएस्सी, एमएस्सी नर्सिंग – १०,०००

नव्या नियमावलीतील ठळक मुद्दे
– प्रवेशावेळी रक्कम भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ द्यावा
– रक्कम भरण्याची जबरदस्ती करता येणार नाही.
– ही रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत गुंतवावी लागेल. व्याजाची रक्कम उत्पन्नाचे साधन म्हणून दर्शवावी लागणार.
– याची सर्व माहिती “एफआरए’कडे द्यावी लागेल.
– रकमेची माहिती बँक खाते तसेच अकाउंट बुकमध्ये दर्शवावी लागेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.